संदीप पाठक हा मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना तो दिसला. प्रत्येक भूमिकेतून त्याने त्याची वेगळी छाप पाडली. संदीप पाठक सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टच्या अपडेटबरोबरच तो अनेक व्हिडिओही शेअर करताना दिसतो. सध्या संदीप त्याच्या 'वऱ्हाड निघालं लंडनला' या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात आहे.
'वऱ्हाड निघालं लंडनला' या नाटकाचे अमेरिकेत प्रयोग होत आहेत. नुकताच या नाटकाचा ५५१वा प्रयोग झाला. संदीप पाठकच्या नाटकाचा हा प्रयोग पाहण्यासाठी चक्क ९०व्या वर्षांच्या आजी आल्या होत्या. त्या आजींनी 'वऱ्हाड निघालं लंडनला' नाटक पाहिल्यानंतर अभिनेत्याचं कौतुकही केलं. संदीप पाठकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन या आजींबरोबरचा व्हिडिओ शेअर केला आहे. "मी आताच डेलावेअरमध्ये ५५१वा प्रयोग संपवला. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला सुमन आजी भेटल्या. वय वर्ष ९० आहे. आणि ९०व्या वर्षी त्या १ तासाचा प्रवास करून नाटकाचा प्रयोग बघायला आलेल्या आहेत. माझं नाटक बघितलं आणि त्यांना खूप आवडलं", असं संदीप व्हिडिओत म्हणत आहेत.
त्यानंतर त्या आजी अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. "मला नाटक खूप आवडलं. तुझा अभिनय म्हणजे एकदम उत्तम. तुमचा अभिनय बघूनच हसू येतं", असं आजी म्हणत आहेत. संदीप पाठक आजींचे आशीर्वादही घेत आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
संदीप अनेकदा असे व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान, सध्या तो कलर्स वाहिनीवरील 'इंद्रायणी' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो अंताजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.