Shah Rukh Khan Praised Bhargava Jagtap: भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा काल नवी दिल्लीत मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीने आपली छाप पाडली. 'नाळ २' या चित्रपटातील अभिनयासाठी मराठमोळा बालकलाकार भार्गव जगतापला 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' पुरस्काराने गौरवण्यात आले. या सोहळ्यातील एक हृदयस्पर्शी क्षण म्हणजे जेव्हा बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख याने मराठी बालकलाकार भार्गव जगताप याची पाठ थोपटून त्याला मिठी मारली.
७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'नाळ २' या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. 'नाळ २' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार पटकावला. या चित्रपटाने केवळ दिग्दर्शनाच्या बाबतीतच नव्हे, तर अभिनयाच्या बाबतीतही राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. या चित्रपटातील अभिनयासाठी भार्गव जगताप, त्रिशा ठोसर आणि श्रीनिवास पोकळे या तीन बालकलाकारांना 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' या पुरस्काराने गौरवण्यात आले. या लहानग्या कलाकारांनी संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावली.
याच सोहळ्यात, शाहरुख खानला त्याच्या 'जवान' (२०२३) चित्रपटातील भूमिकेसाठी, तर विक्रांत मेस्सीला '१२ वी फेल' या चित्रपटासाठी संयुक्तपणे 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्काराने गौरवण्यात आले. अभिनेत्री राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटातील भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाला. तसेच ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.