Swapnil Joshi: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला हिंदी-मराठी वाद अखेर मिटला. राज्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा सर्व स्तरातून कडाडून विरोध करण्यात आला. जनतेतून याविरोधात संतापाची लाट उसळली. त्यानंतर हा जीआर सरकारने मागे घेतला. त्यात आता राज्यात मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच अभिनेता स्वप्नील जोशीनेही (Swapnil Joshi) हिंदी सक्तीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून वन मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या कार्यक्रमाला पोहोचलेल्या स्वप्नील जोशीने हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर आपलं मत मांडलं आहे. त्यादरम्यान, साम टीव्ही सोबत संवाद साधताना स्वप्नील जोशी म्हणाला,"मराठी कलाकार आणि अभिनेत्यापलीकडे मी एक मराठी माणूस आहे. मी महाराष्ट्रात राहतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की, हिंदीची सक्ती नको. ज्याला हिंदी शिकायचं आहे त्यांनी जरुर शिकावं. पण, हिंदी शिकलीच पाहिजे, अशी सक्ती असू नये. या मताचा मी आहे."
सुधारित शासन निर्णयात काय म्हटलं...?
हिंदी ही 'अनिवार्य' ऐवजी 'सर्वसाधारणपणे' तिसरी भाषा असेल आणि शाळेतील प्रत्येक इयत्तेत २० विद्यार्थ्यांनी हिंदी व्यतिरिक्त इतर भारतीय भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना ती भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, ही संख्या कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांना ती भाषा ऑनलाइन शिकवली जाणार आहे.