Join us

"आम्ही दोघी सांगलीपासूनच्या मैत्रिणी" गिरीजा ओकने व्यक्त केलं सईवरचं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 16:07 IST

सई गिरीजाच्या आजोबांकडे फ्रेंच शिकायला जायची

मराठीतील दोन अशा अभिनेत्री ज्या खरं तर प्रसिद्ध होण्याच्या आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत. सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि गिरीजा ओक (Girija Oak) यांची ओळख सांगलीपासूनची आहे. सई तर मूळची सांगलीची आहे हे तर अनेकांना माहितच असेल. तर गिरीजा ओकचं आजोळ सांगलीचं आहे. सई गिरीजाच्या आजोबांकडे फ्रेंच शिकायला जायची अशी आठवण गिरीजाने नुकतीच शेअर केली. सई आपली किती जवळची मैत्रीण आहे हे गिरीजाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

अभिनेत्री गिरीजा ओक सध्या 'जवान' सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुख खानच्या या सिनेमात तिने छोटी भूमिका साकारली आहे. यानिमित्त गिरीजा अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. दरम्यान एका मुलाखतीत गिरीजाला सई आणि तिच्या मैत्रीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर गिरीजा म्हणाली, "मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असावी जिने खून जरी केला आणि ती आपल्याकडे आली तरी तुम्ही तिला तू का खून केला असं विचारण्याऐवजी आधी माझ्यामागे लप असं म्हणावं. माझं आणि सईचं नातं असंच आहे. हे असं का आहे मला माहीत नाही पण हे असं आहे. आम्ही शाळेत असल्यापासूनच्या मैत्रिणी आहोत. मी नववीत ती दहावीत असेल.ती सांगलीत राहायची आणि माझं आजोळ सांगलीचं. ती माझ्या आजोबांकडे फ्रेंच शिकायला यायची तेव्हापासून आमची ओळख झाली.'

सई जेव्हा मुंबईत आली तेव्हा मी सोडून ती कोणालाच ओळखत नव्हती. आम्ही खूप गप्पा मारायचो. धमाल असायची. माझं तिच्यावर  खूप जास्त प्रेम आहे आणि तिचा प्रचंड अभिमानही आहे. आज तिच्या एकटीच्या मेहनतीमुळे तिने हे यश मिळवलंय. मला प्रचंड गर्व वाटतो हे सांगताना की मी अशा एका व्यक्तीला ओळखते जिने आपलं आयुष्य शून्यापासून घडवलंय. ती प्रत्येक विरुद्ध परिस्थितीशी लढलीये आणि ती परिस्थिती काय होती हे ज्यांना माहितीये त्यांना त्यांना माहितीये. सई भारीच आहे.'

सई आणि गिरीजा मराठीतील अतिशय घट्ट मैत्रिणी आहेत. अनेकदा दोघींनी आपल्या मैत्रीचे किस्से सगळ्यांसमोर सांगितले आहेत. 

टॅग्स :गिरिजा ओकसई ताम्हणकरमराठी अभिनेता