Join us

भारतीय सैन्याच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, पत्रकारितेत घेतली पदवी, मग अशी मराठी इंडस्ट्रीतील अप्सरा बनली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 07:00 IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज तिचा वाढदिवस आहे. सोनाली कुलकर्णी हिचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील लष्करी छावणीमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केलं आहे. तिची आई सविंदर ही पंजाबी असल्यामुळे तिच्या बोलण्यातून या भाषेचा ठेहराव दिसतो.

सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. त्यातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. 

सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली.  गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, हाय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा यासारख्या सिनेमांमध्ये ती झळकली होती.याशिवाय शटर, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, विकी वेलिंगकर या चित्रपटात सोनालीने काम केले आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी