Join us

'बाजीगर'च्या सेटवर रेशम टिपणीसने सगळ्यांसमोर शाहरुखला बोचकारलं; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:48 IST

Resham tipnis:अलिकडेच रेशमने 'हे तर काहीच नाय' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने 'बाजीगर' चित्रपटातील तिच्या आणि शाहरुखच्या एका सीनविषयी घडलेला मजेशीर किस्सा सांगितला.

‘रोमान्सचा बादशहा’ या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. गेल्या कित्येक वर्षांपासून शाहरुख प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 'राज', 'मैं हूँ ना', 'बाजीगर', या आणि अशा असंख्य चित्रपटात काम करुन त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यातलाच बाजीगर हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री काजोलने स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे त्यांच्यासोबतच मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसदेखील या चित्रपटात पाहायला मिळाली होती. अलिकडेच एका कार्यक्रमात रेशमने या चित्रपटाच्या शुटिंगमधील एक किस्सा शेअर केला आहे. यात तिने चक्क शाहरुखला बोचकारल्याचं सांगितलं आहे.

अलिकडेच रेशमने 'हे तर काहीच नाय' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने 'बाजीगर' चित्रपटातील तिच्या आणि शाहरुखच्या एका सीनविषयी घडलेला मजेशीर किस्सा सांगितला.

"बाजीगर चित्रपटात एक सीन आहे ज्यात शाहरुख दरवाजा उघडतो आणि थेट माझा गळा पकडून मला बेडवर पाडतो. पण, हा सीन करताना त्याने खरोखरच खूप जोरात माझा गळा दाबला होता. यावेळी त्याने काळ्या रंगाचा कोट घातला होता.आणि, त्याच्या आत पांढरा शर्ट घातला होता. पण, त्याची बटणं बऱ्यापैकी उघडी होती. विशेष म्हणजे हा सीन करताना मी त्याला प्रचंड बोचकारलं", असं रेशम म्हणाली. 

पुढे ती म्हणते, "त्याने माझा खरंच खूप जोरात गळा पकडला होता. त्यामुळे मी थोडा वाचायचा प्रयत्न केला. त्यात माझी नखं खूप लांब असल्यामुळे त्याच्या गळ्याच्या अवतीभोवती माझी नखं जोरात लागली. हा सीन शूट झाल्यानंतर शाहरुखने मला जवळ बोलावलं आणि हे बघ तू काय केलंस असं सांगितलं."

दरम्यान, शाहरुखचं हे वाक्य ऐकल्यानंतर 'आता तू तुझ्या बायकोला काय सांगणार?' असा प्रश्न मी त्याला विचारला आणि त्यावर आम्ही सगळेच हसलो. असा मजेदार किस्सा रेशमने सांगितला. विशेष म्हणजे हा किस्सा फार मोजक्या लोकांना माहित होता. मात्र, 'हे तर काहीच नाय'च्या सेटवर रेशमने हा किस्सा जाहीरपणे सांगितला. 

टॅग्स :रेशम टिपणीसशाहरुख खानबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी