Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी बनली पोलीस अधिकारी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 16:50 IST

मीरा जोशी पोलिसाच्या गेटअपमधील फोटोमुळे सोशल मीडियावर आली आहे चर्चेत

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा पोलीस गणवेशातील फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो तिचा आगामी प्रोजेक्टमधील आहे.

फक्त मराठी वाहिनीवर लवकरच स्पेशल पोलीस फोर्स नामक नवीन मालिका दाखल होत आहे. या मालिकेची निर्मिती गिरीश स्वर करत आहेत तर दिग्दर्शन सुनील खेडेकर करत आहेत. या मालिकेत पाच पोलिसांची टीम आहे.

त्यातील एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारताना अभिनेत्री मीरा जोशी दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता संजय बोरकरही पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच मीरा पोलिसाची भूमिका साकारते आहे. 

याबद्दल मीरा म्हणाली की, मी स्पेशल पोलीस फोर्स मालिकेत सहायक पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोलीस अधिकारीची भूमिका मी पहिल्यांदाच करते आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. मालिकेची संपूर्ण टीम खूप छान आहे. त्यामुळे काम करायला मज्जा येत आहे. नुकतेच या मालिकेच्या शूटिंगला भांडुपमध्ये सुरूवात झाली आहे आणि ही फेब्रुवारी महिन्यात प्रसारीत होईल.

याशिवाय मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे. या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.' 

'वृत्ती' चित्रपटाची कथा एका गावात दोन दिवसात घडणाऱ्या गोष्टींवर आधारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :मीरा जोशी