Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनील बर्वेंनी वाढदिवशी शेअर केली भावूक आठवण, म्हणाले, 'माझी मुलं परराज्यात..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 14:10 IST

नुकतंच सुनील बर्वे यांनी वाढदिवसाला एक भावूक आठवण शेअर केली आहे.

मराठीतील अतिशय देखणे अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी काल आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. सुनील बर्वेंनी हिंदी, मराठी, गुजराती भाषांमध्ये चित्रपट, मालिका आणि नाटक अशा सर्वच क्षेत्रात उत्तम काम केलं आहे. आजही ते काम करुन थकले नाहीत तर सतत कामात व्यस्त असलेले बघायला मिळत आहेत. नुकतंच सुनील बर्वे यांनी वाढदिवसाला एक भावूक आठवण शेअर केली आहे.

सुनील बर्वेंना त्यांच्या वाढदिवशी लोकमत फिल्मीने सरप्राईज दिले. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत एक भावूक आठवण सांगितली. ते म्हणाले,'मी जेव्हा ५० वर्षांचा झालो तेव्हा मला खूप मोठं सरप्राईज मिळालं होतं. कोल्हापूरमध्ये महेश मांजरेकर यांच्या वाडा सिनेमाचं चित्रीकरण सुरु होतं. माझी मुलं तेव्हा बंगलोरला शिकायला गेली होती. मला काहीच कल्पना नव्हती आणि अचानक माझी बायको आणि मुलं माझ्या वाढदिवसाला सकाळीच कोल्हापूरला पोहोचले. तो माझ्यासाठी जे सरप्राईज होतं ते मी कधीच नाही विसरु शकणार.'

ते पुढे म्हणाले,'मला माझ्या भावना कंट्रोल करणं अवघड झालं होतं. कारण मी नेहमी कामात व्यस्त असायचो. मी घरी आलो की ते झोपलेले असायचे आणि ते सकाळी उठून शाळेत जाताएत तेव्हा मी झोपलेलोय अशा पद्धतीने ती मोठी झाली. कॉलेजमध्ये जाताच ते परराज्यात शिकायला गेले. त्यामुळे ते आपणहून मला असे भेटायला आले ती माझ्यासाठी खूपच भावूक आठवण आहे.'

सुनील बर्वे यांचं नाव आजही मराठी कलाविश्वात आदराने घेतलं जातं. त्यांनी 'अफलातून' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर 'मोरुची मावशी' या गाजलेल्या नाटकातही त्यांनी काम केलं. नुकतेच ते 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत दिसले. 'आई', 'गोजिरी',  'लपंडाव','तू तिथं मी' या मराठी सिनेमांमध्येही भूमिका साकारली. त्यांचा आगामी 'काटाकिर्रर्र' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सुनील बर्वेमराठी अभिनेता