अनेक कलाकारांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसायचे, याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. सध्या दोन मराठी कलाकारांच्या फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोत दिसणारी दोन मुलं आज मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत. पण, हा फोटो पाहून आता त्यांना ओळखणं कठीण आहे.
हा फोटो २० वर्षांपूर्वीचा आहे. फोटोत दिसणाऱ्या या दोन कलाकारांनी २० वर्षांपूर्वी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. आता पुन्हा हा योगायोग जुळून आल्यामुळे अभिनेत्याने २० वर्षांपूर्वीची ही आठवण शेअर केली आहे. फोटोत दिसणारे हे दोन कलाकार म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ आहेत. सिद्धार्थ आणि अमेयच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील हा फोटो आहे. कवडसे या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं. आता ते फसक्लास दाभाडे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
सिद्धार्थ चांदेकरनेअमेय वाघसोबतचा हा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. "२० वर्षांपूर्वी आम्ही एकत्र आमच्या career ची सुरुवात केली. ‘कवडसे’ हा आमचा दोघांचाही पहिला सिनेमा. त्यात आम्ही एकमेकांना सांभाळून घेणारे भाऊ होतो. आता परत...२० वर्षांनी. तेच भाऊ. तेच प्रेम. एक इरसाल नवी श्टोरी. फसक्लास दाभाडे. २४ जानेवारी २०२५ ला", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर अमेय वाघने कमेंट केली आहे. "२० वर्षे लोटली…. जग बदललं… पण आपण अजूनही तेवढेच निरागस आहोत!", असं त्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.
सिद्धार्थ आणि अमेय 'फसक्लास दाभाडे' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात सिद्धार्थ आणि अमेयसोबत निवेदिता सराफ, क्षिती जोग, हरिश दुधाडे, राजसी भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हेमंत ढोमेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून २४ जानेवारीला सिनेमा प्रदर्शित होतो आहे.