महाराष्ट्रात आणि मुंबईच्या राजकारणात ठाकरे घराण्याचं नाव मोठं आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि राज ठाकरेंपासून ते आता आदित्य आणि अमित ठाकरे ही धुरा सांभाळत आहेत. २० वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी काही मतभेदांमुळे शिवसेना पक्ष सोडला आणि वेगळा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. इतक्या वर्षांनंतर राज आणि उद्धव हे बंधू मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आले. एकत्रच आलो नाही तर एकत्र राहणारही अशी आरोळी उद्धव ठाकरेंनी दिली. हा क्षण अनेक जणांनी याचि देही याचि डोळा अनुभवला. काल अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या विजयी मेळाव्याला उपस्थिती लावली होती. दरम्यान एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आहे.
'दुनियादारी'फेम अभिनेता प्रणव रावराणे (Pranav Raorane) सगळ्यांनाच माहित आहे. ठाकरे बंधूंच्या कालच्या विजयी मेळाव्यानंतक त्याने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो, "आज साधारण वीस वर्षांपूर्वीचा दिवस आठवला जेव्हा हे भाऊ वेगळे झाले होते… तेव्हा मी काळाचौकी ला राहायचो म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात… कोणाचाच विश्वास बसत नव्हता की ठाकरे बंधू वेगळे होता आहेत. काही वेळाने टीव्ही वर राज साहेबांच भाषण लाईव्ह सुरू झाल… मी, माझी आई, बहीण, शेजारच्या काकी, त्यांचा मुलगा, शेजारची शुभांगी ताई, तिची आई, भाऊ, वहिनी ( गिरणगावात सुखदुःखात कमीत कमी येवढी माणस तरी लगेच जमतात) आणि राज साहेबांनी जाहीर केले “मी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा देतो आहे… “ आणि आमच्या त्या घरातल्या सगळ्या बायका ढसाढसा रडायला लागल्या… जणू काही आपल्याचं घरात ही फूट पडली आहे. तेव्हा कळाल की आपण किती जोडलेले आहोत या कुटुंबाशी. पुन्हा हे दोघे एकत्र येतील बाळासाहेब त्यांना एकत्र आणतील. ही भाबडी आशा होतीच. पण ते घडल नाही."
तो पुढे लिहितो, "आणि आज तो दिवस आला जेव्हा हे भाऊ एकत्र आले. आणि असं वाटलं २० वर्षांनी पूर्वी माझ्या घरात माझ्या लोकांसारखी महाराष्ट्रात रडणारी अनेक लोकं आज आनंदाने हसली असतील. हे दृश बघून सुखावली असतील. आणि स्वर्गीय बाळासाहेब ही सुखावले असतील. आता काही दिवस का असेना आम्हा सामान्य मराठी माणसाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येणार. ते नाही का क्रिकेट खेळताना कितीही मोठा target असला तरी अजून सचिन आहे रे…! किंवा विराट खेळतो आहेना बस… आपण जिंकणार…..! आजही तसंच वाटत आहे आपण जिंकणार…..! फक्त एकच विनंती आहे अमराठी उद्योजकांना किंवा लोकांना मराठीचे धडे देण्यापेक्षा… मराठी माणसाला उद्योजक होण्याचे धडे द्या… बाकीचे आपहूनच होईल… अर्थात हा माझा विचार आहे… असो आपण मात्र आजचा दिवस घरात गोडाच जेवण करून साजरा केला. कारण पाकीट मिळायला मी काही राजकीय कार्यकर्ता नाही….जय महाराष्ट्र…"