Join us

'जय मल्हार' मालिकेसाठी देवदत्त नागेने दिला होता नकार; अभिनेत्याने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:50 IST

छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग कमालीचा वाढला आहे.

Devdatta Nage On Jai Malhar Serial: छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग कमालीचा वाढला आहे. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर सुद्धा चाहत्यांच्या मनात घर करुन जातात. त्यातील एक मालिका म्हणजे 'जय मल्हार'. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील 'जय मल्हार' ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे, ईशा केसकर तसेच सुरभी हांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 'जय मल्हार' मालिकेने या कलाकारांना मनवी ओळख मिळाली. परंतु, या मालिकेसाठी अभिनेता देवदत्त नागे ने आधी नकार दिला होता. याबाबत त्याने नुकताच खुलासा केला आहे. 

नुकतीच देवदत्त नागेने अमोल परचुरेंच्या 'कॅचअप' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान मुलाखतीमध्ये देवदत्त म्हणाला, 'देवयानी' मालिकेतला भय्याराव लोकांना आवडायला लागला आणि मी हळूहळू लोकप्रिय व्हायला लागलो. तेव्हा मनात भावना निर्माण झाली की, आपण जे काही करत आहे ते माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचत आहे. मी प्रेक्षकांना कधीच प्रेक्षक म्हणत नाही. म्हणजे ते मायबाप रसिक आहेतच; पण ते कुटुंबासारखेही आहेत. तर 'देवयानी' मालिका करत असताना मला 'जय मल्हार' साठी विचारण्यात आलं. मी 'जय मल्हार' मालिका आधी घेतच नव्हतो. मग मला मनोज कोल्हटकर यांनी फोन केला आणि सांगितलं की, महेश कोठारे एक प्रोजेक्ट करत आहेत. पौराणिक प्रोजेक्ट आहे. पण खंडोबा की ज्योतिबा? कुणावर करत आहेत हे माहीत नाही. पण मला वाटतं, तू तिथे चांगला दिसशील. तर तू जाऊन भेटून ये. 

पुढे त्यांना सांगितलं,"तेव्हा माझं असं झालं की, 'देवयानी' मालिका चांगली सुरू आहे ना? मग कशाला वगैरे... मग त्याच्यानंतर त्यांनीच माझे सगळे फोटो तिकडे पाठवले. मग तिकडून मला फोन यायचे; पण मी ते उचलत नव्हतो.  मग म्हटलं त्यांच्यासाठी आणि महेश सरांना समोरून नाही म्हणण्यासाठी जाऊ. कारण महेश सर इतकी मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना समोर जाऊन मला नाही म्हणणार, हे सांगायचं होतं. पण, त्यांनी मला त्या कपड्यात अडकवलं आणि मग 'जय मल्हार' हिट झाली. तेव्हा मला ही अपेक्षा नव्हती की, 'जय मल्हार' हिट होईल." असा खुलासा देवदत्त नागेने केला. 

टॅग्स :देवदत्त नागेमराठी अभिनेतासेलिब्रिटी