Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला किडनॅप करण्यात आलं होतं, तीन दिवस..." भूषण कडूचा खुलासा, सांगितला धक्कादायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:58 IST

भूषण म्हणाला, "कुठेतरी जेव्हा चांगलं चाललेलं असतं तेव्हा आपल्या पाठीमागे वाईट घडत असतं. "

नाटक, मालिका आणि चित्रपटातून अभिनेता भूषण कडू(Bhushan Kadu)ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्याने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. विनोदाचे अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भूषण मात्र पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेला होता. कोरोना काळात भूषणच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर तो सिनेसृष्टीपासून दुरावला होता. नुकतंच त्याने आयुष्यातील धक्कादायक प्रसंग सांगितला.

'अल्ट्रा झकास'ला दिलेल्या मुलाखतीत भूषण कडू म्हणाला, "कुठेतरी जेव्हा चांगलं चाललेलं असतं तेव्हा आपल्या पाठीमागे वाईट घडत असतं. त्याची आपल्याला कुणकुण नसते. मला किडनॅपही करण्यात आलं होतं. तीन दिवस पु्ण्यात किडनॅप करुन ठेवण्यात आलं होतं. ज्या माणसाने सुपारी घेतली होती त्याने एकाला सांगितलं होतं की याला मध्ये मध्ये मारत राहा. पण त्याने मला मारलं नाही. तो हाताने खोटंच आवाज काढायचा आणि समोरच्याला सांगायचा की मी त्याला मारतोय. कारण तो माणूस मला भूषण कडू म्हणून ओळखत होता. तो म्हणाला, 'मी तुम्हाला मारु शकत नाही. तुम्ही कलाकार आहात. मी तुमचं काम बघतो. माझी मुलंही तुमची चाहती आहेत. म्हणून मी वाचलो."

'बिग बॉस मराठी सिझन 1' मध्ये सहभागी झालेला अभिनेता भूषण कडू. सर्वांना खळखळून हसवणारा साधा सरळ भूषण. बिग बॉसच्या घरात त्याचा मुलगा भेटायला येतो त्या क्षणाने सर्वांचेच डोळे पाणावले होते. भूषणची पत्नी कादंबरी कडूचं 29 मे 2021 रोजी कोरोनाने निधन झालं. तिचं वय फक्त 39 वर्ष होतं. पत्नीच्या निधनाने भूषणला मोठा आघात झाला. त्यांना प्राकिर्थ हा लहान मुलगा आहे. हसत्या खेळत्या सुखी कुटुंबाचं मायेचं छत्रच हरपलं. भूषण त्यानंतर प्रसिद्धीझोतापासून गायबच झाला. 

टॅग्स :भूषण कडुमराठी अभिनेताअपहरण