Join us

‘मन उधाण वारा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 15:43 IST

जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणिवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या विचारांच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे.

जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणिवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या विचारांच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर व संगीत अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटांनी नेहमीच पठडीबाहेरच्या विषयांना हात घालत, मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. ‘मन उधाण वारा’ या चित्रपटातूनही वेगळा विचार सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे निर्माते सतीश कौशिक यांनी यावेळी सांगितले. वाट्यास आलेले आयुष्य जगताना सकारात्मक जगण्याचा प्रयत्न केला, तर त्यातला खरा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो, हे ‘मन उधाण वारा’ या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं आहे. एका उत्तम चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद कलाकारांनी व्यक्त केला.

वेगवेगळ्या पठडीतील चार गाणी या चित्रपटात आहेत. अजय गोगावले, आदर्श शिंदे, सोनू निगम, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे, सतीश चक्रव्रती, अनिशा सायिका या गायकांनी ही गीते स्वरबद्ध केली असून अमितराज, हर्ष,करण, आदित्य (त्रीनिती ब्रोस) सतीश चक्रव्रती या संगीतकारांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.

निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे. ११ ऑक्टोबरला ‘मन उधाण वारा’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सोनू निगम