बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी ही आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे. आज सायंकाळी ममता महाकुंभाच्या संगमावर पिंडदान करणार आहे. सायंकाळी सहा वाजता तिचा पट्टाभिषेक कार्यक्रम होणार आहे.
ममताने यापूर्वी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी महाराज, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अम्बानंद गिरी यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
ममता कुलकर्णी २५ वर्षांनी भारतात परतली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिला मुंबई विमानतळावर पाहिले गेले होते. तिला एवढ्या वर्षांनी भारतात आलेली पाहून सर्वजण शॉक झाले होते. ती बिग बॉसमध्ये भाग घेण्यासाठी आल्याचे बोलले जात होते. परंतू, पुढच्याच महिन्यात ती महामंडलेश्वर होणार असल्याचे समोर येत आहे.
भारत का सोडलेला...
मी भारत सोडण्याचे कारण म्हणजे अध्यात्म . 1996 मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला आणि त्यादरम्यान माझी भेट गुरू गगन गिरी महाराज यांच्याशी झाली. त्यांच्या आगमनानंतर माझी अध्यात्माची आवड वाढली आणि त्यानंतर माझी तपश्चर्या सुरू झाली, असे ममताने सांगितले होते. ममता कुलकर्णीचे विकी गोस्वामीशी लग्न झाल्याबद्दलच्या चर्चा होत्या. मी कोणाशीही लग्न केलेले नाही कारण मला त्यासाठी वेळ मिळाला नाही, असेही तिने स्पष्ट केले होते. तसेच छोटा राजनसोबतही माझे नाव जबरदस्तीने जोडले गेल्याचे तिने स्पष्ट केले होते.