Join us

Prithvik Pratap : अभिनेता पृथ्वीक प्रतापने पूर्ण केली आईची इच्छा, वाढदिवशी दिलं खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 10:46 IST

अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या 'या' पोस्टने सगळ्यांचं वेधलं लक्ष, वाचा...

लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो चर्चेत असतो. नुकतीच अभिनेता पृथ्वीक प्रतापने आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पृथ्वीक प्रतापच्या आईचा ६ जून रोजी वाढदिवस आहे आणि त्याने यादिवशी खूपच खास गिफ्ट आईला दिले. पृथ्वीकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या आईसोबत दिसून येत आहे. पृथ्वीकने त्याच्या आईला एका लोकप्रिय साडीच्या ब्रँडची साडी भेट म्हणून दिली आहे. या ब्रँडची साडी घेण्याची त्याच्या आईची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती आणि पृथ्वीकने तिच्या वाढदिवशी ही खास इच्छा पूर्ण केली. 

पृथ्वीकने आईच्या वाढदिवसाविषयी पोस्ट शेअर करत लिहिले, 'प्रिय आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज पर्यंत तू माझ्यासाठी अनेक गोष्टी केल्यास त्याची परतफेड मी कधी करू शकेन की नाही…माहित नाही… पण किमान तुझ्या लाडक्या आणि आवडत्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी एक दुवा म्हणून मी कायम असेन. रोज घरी आल्यानंतर फेसबूकवर सेव्ह केलेल्या ‘सायली राजाध्यक्ष सारीज’ किती कमाल आहेत… मला अशाच साड्या हव्यात हे इतके दिवस सांगत होतीस. म्हणून तुझ्यासाठी प्लॅन केलेलं हे छोटंस सरप्राईज'.

पृथ्वीकच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय. पृथ्वीक प्रतापच्या आयुष्यात त्याची आई जयश्री यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे.  याआधी पृथ्वीकने एकदा आईच्या साडीपासून तयार केलेला कुर्ता अमेरिकेत गेल्यावर परिधान केला होता,त्याचा तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. यासोबतच पृथ्वीकने वेळोवेळी त्यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत, तर अनेकदा मुलाखतींमध्ये आईविषयी भरभरुन बोलताना पाहायला मिळतो.  

टॅग्स :पृथ्वीक प्रतापसेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपटमहाराष्ट्राची हास्य जत्रा