'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली. निखिल बनेदेखील हास्यजत्रेतून घराघरात पोहोचला. कॉमेडी करून प्रेक्षकांची मनं जिंकणारा निखिल बने आता गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. "पोर बदनाम" हे निखिल बनेचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मैत्रीवर आधारित असलेल्या या धमाल गाण्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या गाण्याने अवघ्या ८ तासात १ मिलीयनचा टप्पा पार केला आहे.
या गाण्यात निखिल बनेसोबत मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकर हे प्रमुख कलाकार आहेत. तर सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढेने त्याच्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे. "पोर बदनाम" हे गाणं शुभम प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झाले असून या गाण्याची निर्मिती पायल गणेश कदम आणि गणेश दिनकर कदम यांनी केली आहे. तर सचिन आंबात यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या गाण्याचे बोल अनिरूद्ध निमकर याने लिहिले असून त्यानेच या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणं नाशिकमध्ये चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याची कथा तीन जिगरी मित्रांवर आधारित असून गाण्याचा शेवट प्रेक्षकांना जास्त आवडला आहे.
हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने गाण्याच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी सांगतो, “या गाण्याचं शूटिंग नाशिकला रात्रीच्या वेळी करण्यात आलं. आम्ही एका रात्रीतच शूटिंग पूर्ण केलं आहे. मला एक तर अजिबात डान्स येत नाही. पण दिग्दर्शक सचिन आंबात आणि कोरिओग्राफर व्यंकटेश गावडे यांनी माझ्याकडून डान्स करवून घेतला. आणि माझे दोन जिगरी मित्र मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकर यांनी मला गाण्यात साथ दिली. अशाप्रकारे हे गाणं तयार झालं आहे. प्रेक्षकांना माझी एक विनंती आहे की या गाण्याचा शेवट अजिबात चुकवू नका.” मधुर संगीत, सुंदर कथा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून 'पोर बदनाम' हे गाणं कमाल झालं आहे. तुमच्या मित्रांसोबत धम्माल, मस्ती करण्यासाठी हे गाण नक्की बघा !