Join us

अभिनेत्री हृता दुर्गुळे पहिल्यांदाच बॉयफ्रेंडसोबत माध्यमांसमोर; ‘लोकमत’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 22:10 IST

आज लोकमतच्या मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात हृतानं सगळ्यांची नजर ओढून घेतली. कारण यावेळी हृता एकटी नव्हती

मुंबई – मराठी मालिकेतील प्रसिद्ध चेहरा जिनं तरुणाईला वेड लावलं, फुलपाखरु बनून तरुणाईच्या हृदयाची धडधड वाढवली, त्या अभिनेत्री हृता दुर्गुळेने (Hruta Durgule) अलीकडेच तिच्या प्रेमाविषयी सोशल मीडियात पोस्ट केले. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हृता नं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. तिने प्रियकरासोबत एक फोटो शेअर केला आणि या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून तिने तिचं प्रेम व्यक्त केलं.

विशेष म्हणजे हृताच्या या पोस्टनंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. आज लोकमतच्या मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात हृतानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण यावेळी हृता एकटी नव्हती तर तिच्यासोबत तिचा प्रियकर प्रतिक शाह हादेखील होता. सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिल्यानंतर हृता पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात प्रियकरासोबत पाहायला मिळाली.

हृता दुर्गुळेने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये "मला तुझ्यामध्ये अशी आशा सापडली आहे. जी मला कधीच माहित नव्हती", असं कॅप्शन फोटोला दिलं होतं. ऋताच्या प्रियकराचं नाव प्रतिक शाह असून तो लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतिकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. बेहद २', 'बहू बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या मालिकांसाठी त्याने काम केले आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने 'दुर्वा' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने 'फुलपाखरू' मालिकेत काम केले.

मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ॲक्ट्रेस पुरस्काराची मानकरी

अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule)  हिला लोकमत मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ॲक्ट्रेस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असतो. पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांसह उद्योग, प्रशासन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात आले. अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. एखादी व्यक्ती नेहमी ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली की तिची छबी तयार होते पण तिच व्यक्ती जर सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसली की तितकाच निरागसपणा किंवा सिंपलिसिटी त्या व्यक्तीमध्ये दिसून येते आणि त्यामुळे प्रेक्षकांवर त्याची जास्त भुरळ पडते. असंच काहीसं आहे हृता दुर्गुळेबद्दल.

टॅग्स :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसऋता दूर्गुळे