Join us

"लक्ष्मीकांतची दिवाळीत खूप आठवण येते, कारण...", प्रिया बेर्डेंनी सांगितली अभिनेत्याची 'ती' आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 16:11 IST

Priya Berde :अभिनेत्री प्रिया बेर्डे सध्या 'मुलगी पसंत आहे' मालिकेत पाहायला मिळत आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त त्यांनी काही खास जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेत्री प्रिया बेर्डे ( Priya Berde) नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदीतही काम केले आहे. त्यांनी मोठा पडदा गाजवल्यानंतर आता छोट्या पडद्यावरही तितकीच जादू पसरवली आहे. सध्या त्या सन मराठी वाहिनीवरील 'मुलगी पसंत आहे' मालिकेत शकुंतलाच्या भूमिकेत दिसत आहे आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याविषयीचे प्रेम वाढत आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त त्यांनी काही खास जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रिया बर्डे म्हणाल्या, ''दिवाळी हा माझा अत्यंत आवडता सण आहेच, पण तो माझ्यासाठी खास असतो कारण लक्ष्मीकांत आणि आमचा मुलगा, अभिनय ह्यांचा वाढदिवसही याच काळात असतो. पूर्वी आम्ही दिवाळी आणि वाढदिवस मोठ्या थाटात साजरे करायचो, संपूर्ण सिनेसृष्टीतील मान्यवरांना आमंत्रित करून हा उत्सव मोठ्या आनंदात पार पाडायचो. दिवाळी आली की लक्ष्मीकांतची खूप आठवण येते कारण त्याच्या उपस्थितीमुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा असायची. त्याला घर सजवण्यापासून पाहुणचार करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा खूप आनंद असायचा.''

दिवाळीची मजा पारंपरिक गोड पदार्थ आणि फराळाशिवाय अपूर्णच

त्या आठवणी सांगताना प्रिया पुढे म्हणाल्या, "आमच्या घरी दिवाळीची मजा पारंपरिक गोड पदार्थ आणि फराळाशिवाय अपूर्ण असते. आमच्या घरी बाहेरचं विकतचं फराळ फार आवडत नाही, त्यामुळे मी स्वतःच चकल्या, करंज्या, लाडू, आणि चिवडा बनवते. लक्ष्मीकांतला तर माझ्या हातचा फराळ विशेष आवडायचा, खास करून लाडू, आणि तो मला मदतही करायचा.''

रांगोळीविषयीचं प्रेम अजूनच वाढलं

त्या पुढे म्हणाल्या, "दिवाळी आली की  रांगोळी आलीच. मला  रांगोळी काढायला खूप आवडते. पूर्वी मी मोठ्या रांगोळ्या काढायची आणि लक्ष्मीकांत त्या रांगोळ्यांचे कौतुक करायचा. त्यामुळे माझं रांगोळीविषयीचं प्रेम अजूनच वाढलं, आणि दरवर्षी मनापासून रांगोळी काढते. मात्र आता ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेत काम करत असल्यामुळे वेळ कमी मिळतो, तरीदेखील छोटी तरी  रांगोळी दरवर्षी काढतेच.” 

टॅग्स :प्रिया बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डे