Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्स बिश्नोईचे टार्गेट बॉलीवूड! या टोळीला वेसण घालण्याचं मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 11:18 IST

या टोळीच्या हिटलिस्टवर सध्या बॉलिवूडमधील पाचजण असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. त्या नावांची खातरजमा केली जात आहे; पण बोलायला कोणी तयार नाही.

रवींद्र राऊळमुक्त पत्रकार

अमेरिकेतील ९/११च्या हल्ल्यानंतर जगभरातील दहशतवादाची समीकरणे बदलली. त्याचवेळी अंडरवर्ल्डविरोधात मुंबई पोलिसांनी उपसलेल्या एन्काउंटरच्या अस्त्रामुळे बॉलीवूडला वेठीस धरणाऱ्या दाऊद इब्राहीम टोळीसह सर्व टोळ्यांची सद्दी संपल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता लॉरेन्स बिश्नोई टोळी सरसावली आहे. या टोळीने आरंभलेले दहशतीचे सत्र पाहता अल्पावधीत ती दाऊद टोळीच्या चार पावले पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणूनच देश-विदेशात नेटवर्क असलेल्या या टोळीला वेसण घालण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.

बॉलीवूडवर पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या दहशतीचे काळे ढग पसरले आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमक्या मिळताहेत, गोळीबार आणि हल्ले होताहेत आणि जाहीरपणे त्याची जबाबदारीही घेतली जातेय. आधी अभिनेता सलमान खान, मग कॉमेडीकिंग कपिल शर्माचा कॅनडातील कॅफे, दिशा पटणीच्या बरेलीतील घराबाहेर गोळीबार आणि आता दिग्दर्शक रोहित शेट्टी. गँगची टार्गेट लिस्ट वाढत चाललीय. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर पाच गोळ्या झाडल्यानंतर फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. 'हा तर ट्रेलर आहे. पुढच्या वेळी गोळ्या थेट बेडरूममध्ये छातीवर झाडल्या जातील. ही धमकी केवळ रोहित शेट्टी यांना नाही तर संपूर्ण बॉलिवूडलाच इशारा आहे, वेळ असेपर्यंत सुधरा. अन्यथा वाईट परिणाम होतील. तुमची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल. आम्ही ज्यांना ज्यांना फोन केले आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे नाहीतर तुम्हाला लपण्यासाठी जागाही शिल्लक राहणार नाही', असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या टोळीच्या हिटलिस्टवर सध्या बॉलिवूडमधील पाचजण असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. त्या नावांची खातरजमा केली जात आहे; पण बोलायला कोणी तयार नाही.

कधी गायक बी प्राक आणि पवन सिंह यांना ठार मारण्याची धमकी, तर मुंबईत सलमान खानचे घनिष्ट मित्र बाबा सिद्दिकी यांची हत्या. टोळीचा दबदबा चढत्या भाजणीने वाढत राहील याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. १९९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये असलेली दाऊद टोळीची दहशत आता लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावावर जमा होऊ घातलीय. बॉलिवूडमधील नामवंतांना लक्ष्य करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत दहशत दूरदूरपर्यंत पसरत खंडणीसाठी इतर मासेही सहज गळाला लागतात. तेही विदेशात बसून, बिश्नोई टोळीची मोडस ऑपरेंडी बहुतांशी दाऊद टोळीशी मिळतीजुळती आहे. जगभर जाळे पसरलेल्या बिश्नोई टोळीला महाराष्ट्रातूनच मसल पॉवर मिळतेय. बॉलीवूडला टार्गेट करण्यासाठी तीच कामाला येत असल्याने काम सोपे झालेय. तुरुंगात सुरक्षित बसून सूत्रे हलवणाऱ्या बिश्नोईपर्यंत कसे पोहोचायचे हा प्रश्न मुंबई पोलिसांना भलताच छळतोय.

चार वर्षापूर्वी पंजाबमध्ये गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करून कुख्यात झाल्याने जगभरात वाढलेला दबदबा बिश्नोईला सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याची आयडिया देऊन गेला. त्या हत्येत महाराष्ट्रातील संतोष जाधव, सिद्धेश कांबळे यांची नावे शार्पशूटर म्हणून पुढे आल्याने पुण्यातील गुन्हेगारी टोळ्या बिश्नोई टोळीपासून प्रभावित असून, त्या बिश्नोई टोळीशी जोडल्याचे स्पष्ट झाले. रोहित शेट्टी घरावरील हल्ल्याप्रकरणी पाच आरोपींना पुण्यातूनच अटक करण्यात आली, यावरून हे सिद्ध होते.

बॉलीवूडवर अंडरवर्ल्डचे आघात...

दाऊद टोळीसाठी अबू सालेमने केलेली कॅसेटकिंग गुलशन कुमार यांची हत्या हा बॉलिवूडसाठी रेड सिग्नल होता. खंडणीबरोबरच व्यावसायिक वैमनस्य आणि संगीतकार नदीम सैफीसोबतच्या वादाचीही किनार त्याला होती. चित्रपट निर्मात राजीव राय यांनी तर अंडरवर्ल्डच्या धमक्यांना घाबरून देश सोडला आणि दोन दशके विदेशात राहिले. दिग्दर्शक राकेश रोशन यांना एकदा नव्हे तर अनेकदा धमकावण्यात आले. एकदा त्यांच्यावर गोळीबारही झाला होता. धमक्या मिळाल्याने आमीर खानला बुलेटप्रूफ गाडी खरेदी करावी लागली होती. शाहरूख खानचीही त्यातून सुटका झाली नाही. गँगस्टर रवी पुजारीकडून अक्षयकुमारला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. महेश भट्ट यांच्यावर हल्ला करण्याचा अंडरवर्ल्डचा डाव पोलिसांनी उधळून लावला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Lawrence Bishnoi gang targets Bollywood, Mumbai police face challenge.

Web Summary : Lawrence Bishnoi gang's threats and attacks are creating fear in Bollywood. Following shootings at homes of celebrities and directors, police are investigating the gang's network. The gang extorts money and uses tactics similar to the Dawood gang, posing a challenge for Mumbai police to stop them.
टॅग्स :बॉलिवूडमुंबई पोलीस