Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्याकडे बायकोच्या चहाड्या करणारा...", विजू मानेंसाठी कुशलची खास पोस्ट, पत्नी कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:39 IST

"सीजनचा पहिला आंबा माझ्याकडे आणि परदेशातील पहिला खंबा...", विजू मानेंच्या वाढदिवशी कुशलची पोस्ट

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने यांनी अनेक हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले. 'शिकारी', 'शर्यत', 'बायोस्कोप', 'पांडू', 'खेळ मांडला' हे त्यांचे गाजलेले सिनेमे. चित्रपटांबरोबरच विजू माने 'स्ट्रगलर साला' या युट्यूब सीरिजसाठी ओळखले जातात. आज त्यांचा वाढदिवस आहे. विजू माने यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता कुशल बद्रिकेने खास पोस्ट लिहिली आहे. 

कुशल आणि विजू माने एकमेकांचे जिगरी यार आहेत. कुशलने विजू माने यांच्याबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने पोस्टही लिहिली आहे. 

कुशल बद्रिकेची विजू मानेंसाठी पोस्ट 

जगात जे जे काही सुंदर आहे ते ते सगळं मी पहायला हवं आणि जे जे काही भारी आहे ते ते मला मिळायला हवं, असं ज्याला कायम वाटतं त्याचा आज वाढदिवस !!!आज विचार करत होतो की जगासाठी लेखक दिग्दर्शक आणि निर्माता असणारा विजू माने माझ्यासाठी कोण आहे ? तर…

माझ्या घरासाठी “कुणी घर देतं का रे…? घर..." म्हणत हिंडणारा....स्वतःसाठी driver ठेवताना “आम्हा दोघांच्या गाड्या चालवाव्या लागतील", असं कबूल करुन घेऊन तेवढ्यासाठी driver ला जादा पगार देणारा ...

बायकोला तोंडावर उलट बोलता येत नाही म्हणून माझ्याकडे तिच्या चहाड्या करणारा...corona ची लस मला आधी मिळावी म्हणून रांग मोडणारा आणि माझ्या bpच्या report साठी रांगेत उभा रहाणारा...

तशी मैत्रीत आम्ही काही कामं वाटून घेतली आहेत...जसं की सीजनचा पहिला “आंबा” माझ्याकडे पोचवण्याचं काम त्यांच्याकडे आहे आणि मी परदेशातून परत आलो की पहिला “खंबा” त्यांच्याकडे पोचवण्याचं काम माझ्याकडे.

विजू दादा आणि माझी shoe size एकच आहे म्हणून मी त्यांचे बूट वापरतो आणि त्यांचे कपडे संत्याला होतात म्हणून तो ते ढापतो. बाबा ह्या दोन्ही size मधे बसत नाही त्यामुळे ते दोघे बऱ्याचदा “बसतात” 🍻 !!!

सांगूका...मैत्रीचा प्रवास हा जंगलातून प्रवास करण्यासारखा आहे. बायको नामक वाघिणीने कितीही “हल्ला” केला तरी मैत्रीवरचा विश्वास “हल्ला” नाय पाहिजे आणि ३०/३० चे दोन घेऊन लेट नाइट घरी गेलेला माणूसपण “हल्ला” नाय पायजे. म्हणजे मैत्री कायम टिकून राहते.

बाकी रात्री मैत्रीला भेटू……. आज विजू मानेकडून आहे... आणि जेवणसुद्धा आहे. आपण फक्त happy birthday म्हणायचं बास !!!

कुशलच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी विजू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर विजू मानेंची पत्नी अनघा यांनीही कमेंट केली आहे. "हो? माझ्या चहाड्या करतात?" अशी कमेंट तिने केली आहे. त्यावर कुशलने "मी असं काही बोललोय का? अरे देवा एडिट करायला हवं" असं उत्तर देत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. 

टॅग्स :कुशल बद्रिकेविजू मानेमराठी अभिनेता