Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिती सॅनन साकारतेय मराठमोळ्या पार्वतीबाई, आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी 'या' व्यक्तीने केली तिला मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 21:00 IST

'पानीपत' या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे.

रुपेरी पडद्यावर लवकरच पानीपतचं युद्ध पाहायला मिळणार आहे. लवकरच आशुतोष गोवारीकर यांचा 'पानीपत' हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. तर बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत आपले प्रस्थ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे पानिपत या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. 

संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत दिसणार आहे. तर  पार्वतीबाई पानीपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनन मेहनत घेत आहे. मात्र ही मराठी व्यक्तीरेखा साकारणं आव्हानात्मक असल्याचं क्रिती म्हणते. ही भूमिका साकारणं म्हणजे आपल्यासाठी एक वेगळं जग आहे असं क्रितीला वाटतं.

 “मूळची उत्तर भारतीय असल्याने मराठी व्यक्तीरेखा साकारणं आव्हानात्मक होतं. मात्र आशुतोष गोवारीकर यांच्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं गेलं तसंच हा एक सुखद अनुभव होता” असं क्रितीने म्हटले आहे. ६ डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. पानीपतच्या रणांगणावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या. या तिन्ही लढाया ऐतिहासिक ठरल्या. पानीपतची तिसरी आणि शेवटची लढाई अडीचशे वर्षांपूर्वी लढली गेली. मराठा सरसेनापती सदाशिवराव आणि अफगाणी सेनानायक अहमदशाह अब्दाली यांच्यात पानीपतची लढाई झाली. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला होता.

टॅग्स :क्रिती सनॉनआशुतोष गोवारिकर