Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मेरे साई’ या मालिकेत किशोरी गोडबोले दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 20:30 IST

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी गोडबोले आता मेरे साई या मालिकेत प्रवेश करणार आहे.

ठळक मुद्देकिशोरी या मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसणार आहे. मेरे साई या मालिकेद्वारे किशोरी तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. चित्रपट आणि नाटकांत व्यग्र असल्याने तिला मालिकेत काम करता आले नव्हते.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’ ही मालिका अनेक प्रेक्षक नित्यनेमाने बघत असल्यामुळे त्याची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रेक्षकांना या मालिकेतील साधेपणा भावत आहे. साईबाबांची शिकवण प्रत्यक्ष पडद्यावर बघणे हे साईबाबांच्या भक्तांसाठी खूपच खास आहे. केवळ प्रेक्षकांच्या अतीव प्रेमामुळेच या मालिकेने नुकताच 400 एपिसोड्सचा टप्पा पार पाडला आहे. 

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी गोडबोले आता या मालिकेत प्रवेश करणार असून ती या मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसणार आहे. मेरे साई या मालिकेद्वारे किशोरी तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. चित्रपट आणि नाटकांत व्यग्र असल्याने तिला मालिकेत काम करता आले नव्हते. तिच्या या नव्या भूमिकेविषयी किशोरी सांगते, “मी आणि माझे आई-बाबा साईबाबांचे निस्सीम भक्त आहोत आणि जेव्हा बायजा माँ ची भूमिका साकारण्यासाठी मला विचारणा झाली तेव्हा तो साईबाबांचा आशीर्वादच आहे असे मला वाटले. जेव्हा ‘मेरे साई’च्या टीमने मला ऑडिशनसाठी बोलावले, तेव्हा मी अतिशय उत्साहित झाले होते. बायजा माँ एक अतिशय कणखर स्त्री होती आणि त्या काळात हक्कांसाठी ती खंबीरपणे उभी राहत असे, साईबाबांवर तिची अढळ श्रद्धा होती आणि आमच्यामध्ये हाच भक्तीचा समान धागा होता. शिवाय, मालिकेचा दिग्दर्शक सचिन आम्ब्रे याच्याबरोबर या आधी सुद्धा काम केलेले असल्यामुळे पुन्हा त्याच्याबरोबर काम करताना एक वेगळीच सहजता आणि आत्मविश्वास जाणवत आहे. मालिकेतील या भूमिकेत काही चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे. बाबांच्या आशीर्वादाने बायजा माँ च्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील, असा मला विश्वास वाटतो.”

मेरे साई या मालिकेच्या आगामी कथानकात चिऊला लग्नासाठी मागणी घालून विधवांच्या बाबतीतील कठोर रितीरिवाजापासून तिला सोडवण्याचे प्रयत्न श्रीकांत करणार आहे.   

‘मेरे साई’ ही मालिका प्रेक्षकांना सोमवार– शुक्रवार सायंकाळी 6.30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळत आहे.

टॅग्स :मेरे साई मालिका