Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचं तिकीट मिळाल्यावर कंगना रणौतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, 'अधिकृतरित्या पक्षात...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 08:37 IST

कंगनाचा जन्म 'मंडी'चाच आहे. याच ठिकाणाहून तिला BJP कडून उमेदवारी मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत  (Kangana Ranaut) निवडणूकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. अखेर काल यावर शिक्कामोर्तब झाला. भाजपाने काल उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये कंगनाचंही नाव असून ती हिमाचल प्रदेशमधीलमंडी या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Loksabha) लढवणार आहे. सुरुवातीपासूनच भाजपाची बाजू घेणाऱ्या कंगनाला पक्षाने तिकीट दिलं आहे. यानंतर कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाचे आभार मानले आहेत.

कंगनाचा जन्म 'मंडी'चाच आहे. याच ठिकाणाहून तिला उमेदवारी मिळाली आहे. कंगना अनेकदा तिच्या सोशल मीडियावरुन हिमाचल प्रदेशचं सौंदर्य दाखवत असते. आता तिला इथूनच उमेदवारी जाहीर झाल्याने ती भलतीच आनंदित झाली आहे. कंगना लिहिते, "माझा प्रिय भारत देश आणि भारतीय जनतेचा स्वत:चा पक्ष भारतीय जनता पार्टी ज्याचं मी नेहमीच समर्थन केलं. आज भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझी जन्मभूमी मंडी हिमाचल प्रदेश मतदारसंघातून लोकभा उमेदवार म्हणून जाहीर केलं. मी या ठिकाणाहून लोकसभा लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचं स्वागत करते. आज मी अधिकृतरित्या पक्षात सहभागी झाले आहे याचा मला अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. मी एक योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक असेन. धन्यवाद."

कंगना रणौतने काही महिन्यांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यामुळे ती लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चितच झाले होते. कंगनावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. तसंच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगनाचा अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश झाल्याने आता ती जिंकणार की हरणार याकडे लक्ष केंद्रित झालं आहे.

कंगनाचं फिल्मी करिअर पाहता ती अतिशय प्रभावशाली अभिनेत्री असल्याचं नेहमीच जाणवलं आहे. 'क्वीन','तनू वेड्स मनू' सारखे हिट सिनेमे तिने दिले आहेत. मात्र गेल्या काही वर्षात तिचे एकामागोमाग एक सिनेमे फ्लॉप झाले. आता तिचा 'इमर्जन्सी' हा सिनेमा येणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौतराजकारणभाजपामंडीहिमाचल प्रदेशलोकसभा निवडणूक २०२४