Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कबीर सिंग’च्या चाहत्याने एकतर्फी प्रेमातून केले असे कृत्य, वाचून अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 10:26 IST

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. तेवढीच या चित्रपटावर टीकाही झाली. याऊलट काही जण कबीर सिंगच्या नको इतके प्रेमातही पडले.

ठळक मुद्दे ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

शाहिद कपूरच्याकबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. तेवढीच या चित्रपटावर टीकाही झाली. चित्रपटात शाहिद कपूरने साकारलेल्या कबीर सिंग या व्यक्तिरेखेवर लोकांनी जोरदार आक्षेप नोंदवला. नशेत तर्र राहणारा, महिलांना अपमानास्पद वागणूक देणारा ‘सनकी’ कबीर सिंग अनेकांना अजिबात भावला नाही. सोशल मीडियावर याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याऊलट काही जण कबीर सिंगच्या नको इतके प्रेमातही पडले. या चित्रपटाच्या आणि यातील कबीर सिंग या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडलेल्या एका चाहत्याने तर सगळ्या मर्यादा लांघल्या. होय, ‘टिक टॉक’ व्हिडीओमध्ये ‘कबीर’ बनून लोकप्रिय झालेल्या या चाहत्याने एकतर्फी प्रेमातून एका तरूणीची हत्या केली व नंतर स्वत:ही आत्महत्या केली. या चाहत्याचे नाव होते अश्विनी कुमार.

उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे राहणारा अश्विनी कुमार ‘टिक टॉक’ स्टार होता.  त्याला ‘टिक टॉक’ विलन व जॉनी दादा नावाने ओळखले जाई. अश्विनी हा ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील कबीर सिंग या व्यक्तिरेखेच्या नको इतक्या प्रेमात होता. कबीर सिंगच्या तोंडचे डायलॉग आणि त्याची मिमिक्री करणारे अनेक व्हिडीओ त्याने पोस्ट केले होते. ‘जो मेरा नहीं हो सकता उसे किसी और का होने का मौका नहीं दुंगा...’ कबीर सिंगच्या तोंडचा हा डॉगलॉग म्हणतानाचा व्हिडीओ अश्विनी कुमारने शेअर केला होता. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. याच अश्विनी कुमारवर फ्लाईट अटेंडंड म्हणून काम करणा-या निकिता शर्माच्या हत्येचा आरोप लागला. 

अश्विनी कुमार निकितावर एकतर्फी प्रेम करायचा. पण निकिताकडून असे काहीही नव्हते. येत्या डिसेंबरमध्ये निकिताचे लग्न होणार होते. निकिताच्या लग्नाच्या बातमीने अश्विनी सैरभैर झाला होता. गत 30 सप्टेंबरला संतापाच्या भरात त्याने निकिताची हत्या केली आणि तो फरार झाला होता. पोलिसांनी अश्विनीला शोधून काढले आणि त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण आत्मसमर्पण करण्याऐवजी अश्विनीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. अश्विनीने दहा वर्षांपूर्वी निकितावरच्या प्रेमाची कबुली दिली होती. पण निकिताने त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. यानंतर निकिता बिजनौर सोडून दुबई एअर होस्टेसची नोकरी करत होती.

दोन हत्येचा आरोपी26 सप्टेंबरला अश्विनीने एका क्षुल्लक कारणावरून शेजारी राहणा-या दोन चुलत भावांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

डायरेक्टर म्हणतो, ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘ती मुलगी आणि तिच्या कुटुंबासोबत जेकाही झाले ते जाणून मी दु:खी आहे. चित्रपट बनवताना दिग्दर्शकाला संवेदनशील असायला हवे, हे मी मान्य करतो. पण माझ्या कुठल्याही चित्रपटात असे काहीही दाखवले गेले नाही. मग तो  ‘कबीर सिंग’ असो वा ‘अर्जुनरेड्डी’.

टॅग्स :कबीर सिंगशाहिद कपूर