Join us

१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..."

By कोमल खांबे | Updated: July 24, 2025 11:45 IST

जुईला टायफॉइड झाला होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं गेलं होतं. लोकमत फिल्मीशी बोलताना जुईने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत. 

जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई सध्या 'ठरलं तर मग'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून मात्र जुई गडकरीची तब्येत बिघडली आहे. जुईला टायफॉइड झाला होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं गेलं होतं. लोकमत फिल्मीशी बोलताना जुईने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत. 

जुई म्हणाली, "गेल्या काही दिवसांपासून मला थोडं थोडं बरं वाटत नव्हतं. सेटवरही बरेच जण आजारी आहेत. मला त्यात टायफॉइड झाला होता. म्हणजे ताप कित्येक दिवसांपासून अंगात होता. पण तो डिटेक्ट होत नव्हता. ताप खूप वाढला आणि मग मला अॅडमिट व्हावं लागलं. गेल्या दीड महिन्यापासून मी आजारीच आहे. ताप येणं जाणं चालूच होतं. पण, त्यादिवशी मला सेटवर १०२ ताप होता. त्यानंतर घरी पोहोचेपर्यंत ताप १०३ झाला होता. जेव्हा अॅडमिट झाले तेव्हा १०३च्या वर ताप होता. मला उभंच राहता येत नव्हतं. चेहरा सुजला होता. डोळे पाण्याने लाल झाले होते. खूप जास्त त्रास झाला होता". 

या वातावरणात चाहत्यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला जुईने दिला आहे. "सध्याचा व्हायरल हा फार वाईट आहे. खूप दिवस तो तुमच्या अंगात असतो. त्यामुळे तुमचं अंग दुखत राहणार. तुमचं पोट बिघडणार, घसा खराब होणार. तर या सगळ्याची काळजी घ्या. ३-४ दिवस औषधं घेतली आणि बरे झाले. तर असं करू नका. कारण, हा ताप पुन्हा येणार. त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि काळजी घ्या", असं तिने सांगितलं आहे. आता जुईच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे तिने शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. जुईची काळजी घेण्यासाठी तिची आईदेखील तिच्यासोबत सेटवर असते. 

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार