आज 'फसक्लास दाभाडे' सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालाय. हा सिनेमा पाहून अभिनेता जितेंद्र जोशीने त्याचं मत व्यक्त केलंय. जितू लांबलचक पोस्ट लिहून 'फसक्लास दाभाडे'बद्दल त्याचं मत मांडताना म्हणालाय की, "जोरदार दाभाडे.. जबरदस्त दाभाडे.. फसक्लास दाभाडे! बऱ्याच दिवसांनी एक कौटुंबिक चित्रपट आलाय तेव्हा या चित्रपटात अर्थातच एका कुटुंबाची गोष्ट तर आहेच परंतु हे कुटुंब जसं वेगळं आहे तशीच यातली पात्र , घटना आणि पर्यायाने त्याचे होणारे परिणाम सुद्धा अत्यंत वेगळे आहेत."
जितेंद्र पुढे लिहितो की, "विनोदाची उत्तम जाण असलेला लेखकच जर दिग्दर्शकही असेल तर एक जोरदार मनोरंजन करणारी कलाकृती तयार होते शिवाय जोडीला कलाकारही उत्तम असायला हवेत जे इथे आहेत. ज्येष्ठ/नवोदित प्रत्येक कलाकाराने आपापली कामे इतकी चोख बजावली आहेत आणि दाभाडे कुटुंब उभं केलं आहे की प्रत्येकावर एक एक वैयक्तिक पोस्ट लिहायला हवी."
"हा चित्रपट आजवर अनेकदा बोललेल्या आणि एकदाही न बोललेल्या अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपल्याशी बोलत राहतो सोबत विनोदाची आणि भावनिकतेची भक्कम साथ घेऊन उभा राहतो आणि म्हणूनच त्यातल्या भावना आपल्यापर्यंत सहज पोहोचतात. क्षितिज आणि अमितराज जोडी ने पुन्हा कमाल केली आहे . हा चित्रपट चालेल याबाबतीत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही."
शेवटी फसक्लास दाभाडेचा दिग्दर्शक हेमंत ढोमेला शुभेच्छा देताना जितेंद्रने लिहिलंय की, "सर्व मित्रांना मनापासून शुभेच्छा!! आणि हो हेमंत जरा सातत्याने स्वतःसाठी/ इतरांसाठी कुणाहीसाठी का असेना परंतु अधिकाधिक लिहीत रहा.. सिनेमाच, नाटकच असं नव्हे .. पण काहीही लिहीत रहाच. ‘फसक्लास दाभाडे’.. आता आपल्या फॅमिली सकट जवळच्या चित्रपटगृहात!"