Join us

पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:11 IST

लोककलावंतांच्या हालअपेष्टांकडे लक्ष देणार तरी कोण? अर्थात, या कलावंतांसाठी शासनाने काहीच केले नाही असे नाही, पण जे केले ते अत्यंत तोकडे असे केवळ क्षणिक बरे वाटणारे सलाइन आहे.  

- प्राचार्य डॉ. वामनराव जगतापसामाजिक प्रश्नांचे विश्लेषक  

तिभासंपन्न कलावंतांचा गौरव करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘‘माझी दहा भाषणे व कलावंतांचा एक जलसा बरोबरीचे आहे,’’ त्यानंतर आंबेडकरी जलसा, सत्यशोधकी जलसा यांना चळवळीत महत्त्वाचे स्थान मिळाले. शाहिरी, पोवाडा, भारुड, तमाशा, लावणी, गवळण, जागरण-गोंधळ यांसारखे सांस्कृतिक प्रकार ही महाराष्ट्राची  समृद्ध परंपरा आहे. यातील कलावंत बहुतांशी ग्रामीण, मागासवर्गीय आणि अल्पशिक्षित असूनही अपार प्रतिभेचे धनी आहेत. परंतु, या कलावंतांचे जीवन अत्यंत हाल-अपेष्टांचे आहे. आर्थिक दुर्बलतेमुळे अनेकांची आयुष्ये शोकात्म झाली आहेत.   

हे लोककलावंत कलेकडे कधीच व्यवसाय, कमाई म्हणून पाहत नव्हते. निखळ मनोरंजनातून प्रबोधन, युगपुरुषांच्या विचारकार्याचा जागर हेच त्यांचे उद्दिष्ट व ध्येय... या परंपरेत पठ्ठे बापूराव-पवळापासून ते वामनदादा कर्डक यांच्यापर्यंत अनेकांची नावे घेता येतील. त्यांची साधना अनन्यसाधारण होती. एका स्त्री कलावंताबद्दल तर ऐकिवात आहे की, पडद्यामागे जाऊन प्रसूत होऊन अवघ्या काही वेळेतच पुन्हा लगेच मंचावर येऊन तिने कलेचे सादरीकरण केले होते. शाहीर विठ्ठल उमप यांनी तर म्हटले होते की, डॉ. आंबेडकर ज्या मंचावर विराजमान असतील त्याच मंचावर गाता-गाताच आयुष्याचा शेवट होण्यात मी धन्यता मानेन. आणि काय योगायोग, त्यांच्या या इच्छेच्या अधीन राहूनच त्यांना मृत्यूने कवेत घेतले! अनेक कलावंत त्राही-त्राही होऊन सांस्कृतिक इतिहासात विलीन झाले. यानंतरच्या पिढ्यांची स्थितीही वेगळी नाही. 

नाच-गाण्यानं कुठं पोट भरतं का? ही नैराश्य भावना असू नयेजेवढे प्रदेश, जाती व धर्म तेवढेच कलाप्रकार बघायला मिळतात, आणि प्रत्येक दालन तेवढंच समृद्धही. परंतु, नाच-गाण्यानं कुठं पोट भरतं का? हाही प्रश्न तेव्हढाच जुना. अशी नैराश्यभावना स्वत: कलावंत व समाजाची होत असेल तर? हे लक्षण बरे नाही. यातून कलावंतांना अकाली वृद्धत्व, आजारपण-व्याधी व आयुष्याची समाप्ती असा हा क्रम संपूर्ण कुटुंबाचा होऊन बसतो. एकही गाव असं नाही, जिथं वामनदादांचं नाव नाही, असा सार्थ लौकिक असणाऱ्या वामनदादांच्या आयुष्याचा शेवटसुद्धा तशाच शोकात्म स्थितीत झाला. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठेंचंही नेमकं तसंच झालं. सर्वांठायी हीच स्थिती आहे. 

रसिकांना आनंद देणाऱ्या कलावंतांच्या डोळ्यांतील वेदनाश्रू कोण पुसणार? लोकनाट्य तमाशा या अस्सल लोककलाप्रकाराच्या वेदना तर अतीव हृदयद्रावक आहेत. गावगुंडांची मुजोरी-मग्रुरी, आंबटशौकिनांचा असभ्यपणा, कलासंचावर हल्ले, हे सर्व प्रकार असह्य होऊन हा कलाप्रकारही (फड) कालांतराने लयास जातो की काय असे वाटते. केवळ लोकाश्रयातून चालणाऱ्या या कलाप्रकारावर असे गंडांतर येत असेल तर? त्याची निष्पत्ती काय असेल? सर्कशीतील कलावंतांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.सादरीकरणाच्या प्रत्येक क्षणाला ‘मृत्यूशी झुंज’ अशीच रोमांचकारी व हृदयाचा ठोका चुकविणारी स्थिती असते, यांची कला व आयुष्य सुळावरची पोळी असते. झोक्याची दोरी नव्हे, त्यांच्या आयुष्याचीच दोरी तुटण्याचे नाकारता येत नाही. तरीही हे कलावंत मैदान सोडत नाहीत. आयुष्यभर आपल्या अंगभूत कलागुणांमधून दुसऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू भरणाऱ्या या कलावंतांच्या डोळ्यातील वेदनाश्रू कोण पुसणार? समाज व लोकाश्रयाला बऱ्याच मर्यादा आहेत. हे काम नक्कीच त्यांच्याच (कलावंतांच्या) भाषेत मायबाप सरकारचेच आहे. 

टॅग्स :नृत्य