Join us

"गोरीगोमटी मुलगी, आता ते दिवस गेले, हिंदी सिनेसृष्टीत 'हे' बदल आवश्यक- भूमी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 19:19 IST

भूमी पेडणेकरने आपल्या दमदार अभिनय कौशल्यातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या दमदार अभिनय कौशल्यातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. विविध विषयांवर आपली रोखठोक आणि बेधडक मतंही ती मांडत असते. भूमीने 'दम लगा के हइशा' सिनेमातून पदार्पण केले. ज्यात ती पडद्यावर अत्यंत जाड तरुणीच्या भूमिकेत दिसली. तर 'शुभ मंगल सावधान'मध्ये प्रियकराचे लैंगिक त्रास समजून घेणारी मुलगी तिने साकारली.

'लस्ट स्टोरीज'मध्ये तिने लैंगिकदृष्ट्या सक्रीय असलेल्या घरकामाच्या बाईची भूमिका साकारून भारतातील या वर्गातील एक समस्या मांडली. 'सोनचिडिया'मध्ये व्यवस्थेविरोधात ती लढली तर 'सांड की आंख'मध्ये जगातील सर्वात ज्येष्ठ महिला शार्पशुटरच्या भूमिकेत ती दिसली. 'डॉली, किट्टी और वो चमकते सितारे'मध्ये तिने महिलांच्या कुचंबणेबद्दल मत मांडले आणि 'बाला'मध्ये सावळ्या मुलीची भूमिका साकारली होती.

 

भूमी म्हणते, "उत्तर भारतीय गोरीगोमटी मुलगी... आता ते दिवस गेले. हे सगळं महत्त्वाचं नाही, असं मला वाटतं. हिंदी सिनेमातील अभिनेत्री कशी असावी याच्या व्याख्या, संकल्पना मला बदलायच्या आहेत. आपण सगळे या क्षेत्रात आहोत. यातली मूळ संकल्पना अशी आहे की, या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका साकारताना, या अप्रतिम, लोकांना हेलावून टाकणाऱ्या कथांचा भाग बनताना आपण लोक स्वत:बद्दल काय विचार करतात यात बदल आणायला हवेत आणि मी नेमकं तेच करते आहे."

ती पुढे म्हणाली, "मी सौंदर्याचे स्वत:चे निकष मांडणार आहे आणि मी नेमकं तेच करते आहे. माझ्या सिनेमांच्या माध्यमातून मी खरंच काही बदल घडवायचे आहेत. लोकांनी स्वत:वर प्रेम करावं, आपण जसे आहोत तसा स्वत:चा स्वीकार करावा, असं मला वाटतं. अर्थातच मला रसिकांचे मनोरंजन करायचं आहे आणि तोच माझा प्राधान्यक्रम आहे. मला त्यांना एक विचार द्यायचा आहे, सकारात्मक विचार, त्यांच्यासाठी हे जग अधिक छान बनेल असा एक दृष्टीकोण निर्माण करायचा आहे. "

 

टॅग्स :भूमी पेडणेकर