Join us

​हम आपके है कौन मधील हा प्रसिद्ध कलाकार परततोय छोट्या पडद्यावर, अनेक वर्षांनंतर मिळालीय संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 12:53 IST

हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या.

ठळक मुद्देसंजीवनी या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या प्रोमोत आपल्याला मोहनिश आणि गुरदीप कोहली हे संजीवनी मालिकेतील दोन जुने चेहरे पाहायला मिळत आहेत.

मोहनिश बहल हा अभिनेत्री नुतन यांचा मुलगा असून तो गेली २० वर्षं बॉलिवूडमध्ये काम करत आहे. मोहनिश सध्या खूपच कमी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. २०१० पासून तो खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकला आहे. क्रिश आणि जय हो वगळता कोणत्याही मोठ्या बजेटच्या चित्रपटात आपल्याला त्याला या दरम्यान पाहायला मिळाले नाहीये. २०१४ नंतर तर तो कोणत्याच चित्रपटात आपल्याला दिसला नाहीये. त्याला काम मिळत नसल्याने तो चित्रपटात खूपच कमी दिसत असल्याचे त्यानेच काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, काम मिळत नसल्याने मी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मी चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले असे अनेकांना वाटते. पण असे काहीही नाही. मला स्वतःला काम करण्याची इच्छा आहे. पण मला कामच मिळत नाहीये. मला सध्या खूपच कमी भूमिका ऑफर येत आहेत. पण खूप कमी भूमिका ऑफर होत असल्याने कोणत्याही भूमिका स्वीकारायचे हे मला पटत नाही. त्यामुळे चांगले काम असल्याशिवाय काम करायचे नाही असे मी ठरवले आहे.

मोहनिश अनेक वर्षं चित्रपटसृष्टीपासून दूर असला तरी आता तो आशुतोष गोवारिकरच्या पानिपत या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेली आहे. पण त्याचसोबत मोहनिशच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्याच्या संजीवनी या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेचा पहिला लुक नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यात आपल्याला मोहनिश आणि गुरदीप कोहली हे संजीवनी मालिकेतील दोन जुने चेहरे पाहायला मिळत आहेत.

संजीवनी ही मालिका 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत गुरूदीप कोहली, मिहीर मिश्रा, संजीत बेदी, मोहनिश बहल, इरावती हर्षे, शिल्पा शिंदे, अर्जुन पुंज यांच्या मुख्य भूमिका होत्या. ही मालिका एका रुग्णालयातील डॉक्टरांच्या आयुष्यावर बेतलेली होती. या डॉक्टरांचे आपापसातले मतभेद, त्यांच्या प्रेमकथा या मालिकेत पाहायला मिळाल्या होत्या. ही मालिका चांगलीच गाजली होती. 

संजीवनीच्या या नव्या सिझनमध्ये देखील डॉक्टरांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणा असून सुरभी चंदना, सयंतनी घोष आणि नमित खन्ना हे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ही मालिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.  

 

टॅग्स :मोहनिश बहलहम आपके हैं कौन