Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीमुळे दोन हॉलिवूड बिग बजेट चित्रपट लांबणीवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:36 IST

या महामारीचा अजून एक दूरगामी परिणाम दोन बिग बजेट चित्रपटांवर झाला आहे. ‘नो मीन्स नो’ आणि ‘नो टाइम टू डाय’ या हॉलिवूडपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे.

जगभरात कोरोना महामारीने प्रचंड थैमान माजवले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहे. हॉलिवूड सिनेसृष्टी देखील त्यातून सुटलेली नाही. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट रिलीज होत नसून डिजीटल प्लॅटफॉर्मवर लाँच होतांना दिसत आहेत. मात्र, या महामारीचा अजून एक दूरगामी परिणाम दोन बिग बजेट चित्रपटांवर झाला आहे. ‘नो मीन्स नो’ आणि ‘नो टाइम टू डाय’ या हॉलिवूडपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. विकाश वर्मा दिग्दर्शित ‘नो मीन्स नो’ हा पहिला इंडो-पोलिश चित्रपट असून २२ मार्च २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यासोबतच ‘सूर्यवंशी’ आणि ‘८३’ हे चित्रपटही या कारणामुळेच लांबणीवर गेले आहेत.  

रूपेरी पडद्यावर रोमँटिकसोबतच अ‍ॅक्शनपटांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. वेगवेगळया आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रीत केले जाणारे सीन्स प्रेक्षकांची मने जिंकतात. मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का, यासारख्या अ‍ॅक्शन सीन्ससाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. बॉलिवूडच्या सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नो मीन्स नो’ चित्रपटात ध्रुव वर्मा या नव्या दमाच्या अभिनेत्याने त्याच्या शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. सिक्स पॅक्स अ‍ॅब्ज या संकल्पनेला मागे टाकत त्याने हुबेहूब ‘जेम्स बाँड’प्रमाणे स्वत:चा लूक तयार केला आहे. या चित्रपटात भारत आणि पोलंडचे कलाकार असून पोलंडच्या निसर्गरम्य ठिकाणी उणे ३० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.   

 ‘नो मीन्स नो’ या बिग बजेट चित्रपटातून डेब्यू करणारा ध्रुव वर्मा सध्या सर्व प्रेक्षकांच्या  आकर्षणाचे केंद्रस्थान ठरला आहे. त्याचे लूक्स, बॉडी आणि स्टाईल यावर नवी पिढी फिदा झाली आहे. या सर्वांचे श्रेय जाते त्याच्या नव्या लूकला. आजही अनेक अभिनेते हे सिक्स पॅक्स अ‍ॅब्जसाठी खुप मेहनत घेताना दिसतात. मात्र, या चित्रपटातून ध्रुवने जेम्स बाँडचा नवा लूक चर्चेत आणला आहे. यासाठी त्याला बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त आणि हॉलिवूड स्टार स्टिव्हन सेगल यांनी अ‍ॅक्शनचे धडे दिले आहेत. त्याची ग्रुमिंग अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्याकडून केली आहे. तसेच बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर यांनी त्याला डान्सचे विविध प्रकार शिकवले आहेत. तसेच विकाश वर्मा यांचा दुसऱ्या महायुद्धावर आधारित आगामी चित्रपट ‘द गुड महाराजा’ याचेही शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाची शूटिंग जर्मनी, पोलंड, रूस, भारतात होणार आहे.

टॅग्स :हॉलिवूडसंजय दत्तगुलशन ग्रोव्हर