Join us

कोरोनामुळे स्टार वॉर्समधील प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले निधन, सगळ्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 11:02 IST

या अभिनेत्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे.

ठळक मुद्देस्टार वॉर्स या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अँड्यू जॅक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ते ७६ वर्षांचे होते. त्यांना काहीच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका प्रसिद्ध अभिनेत्याचे नुकतेच कोरोना व्हायरसची लागण झाल्याने निधन झाले आहे.

स्टार वॉर्स या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अँड्यू जॅक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ते ७६ वर्षांचे होते. त्यांना काहीच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी सर्रे येथील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. स्टार वॉर्समध्ये त्यांनी साकारलेली इमॅटची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

अँड्यू यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांच्या फॅन्समध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे कामकाज सांभाळणाऱ्या जिल मॅक्लोने त्यांच्या निधनाविषयी प्रसारमाध्यमांना सांगितली असून त्यांच्या निधनाने हॉलिवुडमधील त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. अँड्यू थेम्स नदीवरील एका हाऊसबोटवर राहायचे. त्यांची पत्नी सध्या ऑस्ट्रेलियात असून ती देखील क्वारांटाईनमध्ये आहे. त्यांचे त्यांच्या पत्नीवर जीवापाड प्रेम होते. त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असून त्यांना कोरोनाची लागण होऊन दोन दिवस झाले होते असे या पोस्टद्वारे सांगितले आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या