Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राने पुन्हा एकदा भारताची मान उंचावली! 'आयर्न मॅन'सोबत ऑस्करमध्ये पार पाडणार 'ही' जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:23 IST

९८ व्या अकादमी पुरस्कारांचा हा भव्य सोहळा लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. १६ मार्चला हा सोहळा पाहायला मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीतील बहुमानाचा सोहळा मानल्या जाणाऱ्या 'ऑस्कर २०२६' (98th Academy Awards) मध्ये पुन्हा एकदा भारतीय ठसा उमटला जाणार आहे. बॉलिवूडची 'देसी गर्ल' आणि ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राची या मानाच्या सोहळ्यात 'प्रेझेंटर' (पुरस्कार प्रदान करणारी) म्हणून निवड करण्यात आली आहे. या बातमीमुळे जगभरातील भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

अकादमीने यावर्षीच्या प्रेझेंटर्सची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रियंका चोप्रासोबत 'आयर्न मॅन' फेम रॉबर्ट डाउनी ज्युनियर (Robert Downey Jr.) आणि ऑस्कर विजेती अभिनेत्री ॲन हॅथवे (Anne Hathaway) यांसारख्या दिग्गज हॉलिवूड स्टार्सची नावे समाविष्ट आहेत. इतक्या मोठ्या जागतिक व्यासपीठावर प्रियंकाचे असणे, यावरुन हॉलिवूडमध्ये तिची किती लोकप्रियता आहे, हे दिसून येतं.

दुसऱ्यांदा मिळणार हा मान

प्रियंका चोप्राने यापूर्वी २०१६ मध्येही ऑस्कर सोहळ्यात पुरस्कार प्रदान केला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा तिला हा बहुमान मिळत आहे. प्रियंका केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एक निर्माती आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी म्हणूनही जगभरात लोकप्रिय आहे. तिच्या 'सिटाडेल' (Citadel) आणि इतर जागतिक प्रकल्पांच्या यशानंतर तिला मिळालेली ही संधी तिच्या कारकिर्दीतील एक मोठा मान आहे.

ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर प्रियंंकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी "तिने भारताचे नाव पुन्हा एकदा जगात मोठे केले आहे," अशा कमेंट्स करत आपला आनंद व्यक्त केला आहे. प्रियंकाने स्वतः अद्याप यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली नाही. ९८ व्या अकादमी पुरस्कारांचा हा भव्य सोहळा लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. १६ मार्चला हा सोहळा पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :ऑस्करऑस्कर नामांकनेप्रियंका चोप्रानिक जोनासहॉलिवूड