छोट्या पडद्यावर गाजत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 3). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून आता घरात अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा शो सुरु झाल्यानंतर घरातल १५ स्पर्धकांनी प्रवेश घेतला होता. मात्र, आता यातील अनेक जण घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे घरात हातावर मोजण्या इतकेच स्पर्धक राहिले आहेत. इतकंच नाही तर पूर्वी या घरात एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या अनेकांमध्ये फूट पडली आहे. असाच काहीसा प्रकार विशाल निकमसोबत होणार असून तो त्याच्या ग्रुपमधून बाहेर पडणार आहे.
कलर्स मराठी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये विशाल घरात रडताना दिसत आहे. इतकंच नाही तर रडत असतानाच तो 'आता मी कोणत्याही ग्रुपचा भाग नसेन', असं सांगत विकास, सोनाली, मिनल यांच्या ग्रुपमधून बाहेर पडतो.
"जवळची माणसंच जास्त त्रास देतात. मी नाहीये असा. कोणी नाहीये इथे माझं.मी कोणत्याही ग्रुपचा हिस्सा नाही...आजपासून, आतापासून", असं म्हणत विशाल ग्रुपमधून बाहेर पडतो.
दरम्यान, विकासच्या डोळ्यात पाणी का आलं?कोणामुळे तो ग्रुपमधून बाहेर पडला यामागची कारणं सध्या तरी गुलदस्त्यात आहेत. मात्र, आजच्या भागात या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.