Join us

​‘या’ गंभीर आजाराशी लढतेय लेडी गागा! शो रद्द करण्याची आली वेळ!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 13:49 IST

अमेरिकेची सुप्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. खुद्द लेडी गागाने आपल्या सोशल अकाऊंटवर ही वाईट बातमी ...

अमेरिकेची सुप्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. खुद्द लेडी गागाने आपल्या सोशल अकाऊंटवर ही वाईट बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होय, लेडी गागाला शारीरिक व्याधींनी घेरले आहे. यामुळे तिला आपला जॉन वर्ल्ड टूर रद्द करावा लागला आहे. आपल्या आजारपणामुळे लेडी गागाला या वर्ल्ड टूरचे शेवटचे १० शो रद्द करावे लागले आहे. लेडी गागा ही गाण्यांसोबत तिच्या चित्रविचित्र स्टाईल व कपड्यांसाठी ओळखली जाते.शो रद्द केल्याबद्दल लेडी गागाने आपल्या चाहत्यांची क्षमा मागितली आहे. असे करताना वाईट वाटतेय. पण या घडीला   स्वत:ची काळजी घेणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे, असे तिने लिहिले आहे. शो रद्द करण्याची वेळ यावी, इतके लेडी गागाला झाले तरी काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर लेडी गागाला ‘फायब्रोमायल्जिेया’ नामक आजाराने ग्रासले आहे. हा एक दीर्घकाळ राहणारा आजार आहे. या आजाराने ग्रासलेल्या रूग्णाच्या संपूर्ण शरीरात प्रचंड वेदना होतात. लेडी गागाने याबद्दल फेसबुकवर माहिती दिली आहे. ‘शुक्रवारी रात्री मेडिकल टीमच्या कडक निर्देशनंतर मला शो रद्द करावे लागले आहेत. मी असे केले नसते तर कदाचित मी पुढे गाऊ शकले नसते,’ असे तिने फेसबुकवर लिहिले आहे.गतवर्षी सप्टेंबरमध्ये ब्राझिलमध्ये झालेल्या रॉक इन रिओ फेस्टिवलदरम्यान परफॉर्मन्स करत असताना लेडी गागाची तब्येत बिघडली होती. तिच्या शरिरात प्रचंड वेदना उठल्यावर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रिटनमधून जॉन वर्ल्ड टूरची सुरूवात झाली होती. याठिकाणच्या परफॉर्मन्सदरम्यानही लेडी गागाची तब्येत नादुरूस्त होती. तिचा परफॉर्मन्स लाईव्ह बघणारे बीबीसीचे आर्ट एडिटर विल गोम्पर्ट्ज यांनी याबद्दल सांगितले होते. लेडी गागाला या शोमध्ये परफॉर्म करणे कठीण झाले होते, असे विल म्हणाले होते.