Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हृदयाला छिद्र, बंद रक्तवाहिन्या, जास्तीत जास्त ६ महिने जगेल...", मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला अंगावर काटा येणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:52 IST

मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरील लागिरं झालं जी या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले होते. या मालिकेनं आता निरोप घेतला असला तरी यातील पात्रांचे प्रेक्षकांच्या मनातील घर कायम आहे. यात आज्याची मामीची भूमिका कल्याणी नंदकिशोर हिने साकारली होती. नुकतेच नवरात्रीच्या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या आयुष्यातील अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला आहे.

कल्याणी नंदकिशोर हिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत लिहिले की, मी कल्याणी नंदकिशोर म्हणजेच झी मराठी वरील "लागिरं झालं जी" मधली आज्या ची मामी, "मन झालं बाजिंदं". मधली गुली मावशी, कलर्स मराठी वरील "राजा राणी ची गं जोडी" मधली पंजाबराव ची बायको कल्याणीबाई, सन मराठी वरील "शाब्बास सूनबाई" मधली ईश्वरी. २७ नोव्हेंबर २०१४ ला खुशी चा जन्म झाला आणि साधारण १५ दिवसातच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं आम्हाला समजलं. अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे तिच्या अनेक तपासण्या झाल्यानंतर आणखी एक निदान समोर आलं. तिच्या हृदयापासून फुप्फुसापर्यंत अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या बंद आहेत हे त्या तपासण्या मधुन समजलं.

खुशी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकणार होती. पण....

तिने पुढे म्हटले की, अनेकदा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केले पण तिच्या शरीराची अंतर्गत रचना या प्रकारे आहे की तिला भूल देणं सुद्धा शक्य होत नव्हतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खुशी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकणार होती. पण मला विश्वास होता की स्वामी आई माझ्या पोटी जन्माला आलेली आहे आणि तीच या संकटातून मला आणि माझ्या लेकीला बाहेर काढेल. आज खुशी १० वर्षांची झाली आहे. या १० वर्षांत अनेकदा तिच्यावर संकटं आली. पण माझा विश्वास आणि आम्ही सगळे मिळून तिची घेत असलेली काळजी याच्या जोरावर ती प्रत्येक संकटातून बाहेर पडलेली आहे आणि पुढे सुद्धा ती हा लढा सुरुच ठेवेल अशी मला खात्री आहे.

आजचा रंग निळा. निळा रंग म्हणजे पाण्याचं आणि आकाशाचं प्रतीक. निळा रंग व्यापकता दाखवतो. तीच व्यापकता खेळाडू वृत्तीने घेत मी आणि खुशी अगदी खुशीत हसत खेळत आयुष्य भरभरुन जगत आहोत, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले. 

टॅग्स :लागिरं झालं जी