Join us

"सैतानांना सोईने नाव विसरायचं..." नामदेव ढसाळांची अवहेलना करणाऱ्यांवर संतापला हेमंत ढोमे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 11:23 IST

हेमंत ढोमेनं पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय.

Hemant Dhome On Namdev Dhasal: पद्मश्री, बंडखोर कवी आणि दलित  पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ याच्या कवितांवर 'सेन्सॉर बोर्डा'ने आक्षेप घेतला आहे. कविता आक्षेपार्ह असल्याचं म्हणत या चित्रपटातील सर्व कविता काढून तो प्रदर्शित करण्याची अट सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांसमोर ठेवली आहे. इतकंच नाही तर त्यांनी थेट 'कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही' असा सवाल नोटीसमध्ये विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सध्या सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.   प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेमंत ढोमेनं लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग साईट X (पुर्वीचे ट्विटर)वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं नामदेव ढसाळ यांचा फोटो शेअर करत लिहलं, "जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा?" हा प्रश्न विचारणारा, आणि अनेकांना खटकणारा  पँथर होते नामदेव ढसाळ!  आता या सैतानांना सोईने हे नाव विसरायचं असेल तर ठणकावून सांगा… समता आणि मानवतेचा प्रसार करणारे  पँथर होते नामदेव ढसाळ! महाराष्ट्राने, देशाने जगभरात सगळ्यांनी गौरवलेला… बहुजनांचा नायक, अफाट वैश्विक महाकवी होता 'नामदेव ढसाळ. आपण ठणकावून सांगितलं तर आणि तरंच बदलेल हे चित्र! नुसता एक माणूस हाकलून चालणार नाही आख्खी व्यवस्थाच बदलावी लागणार आहे…  या नायकाने पेटवलेली माणसं पुन्हा पेटवावी लागणार!", या शब्दात त्यानं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 १ जुलै २०२४ मध्ये हा चित्रपट मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे देण्यात आला होता.  ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरलं होतं. पण, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने तो रखडला आहे. 'चल हल्ला बोल' हा चित्रपटाची कथा दलित पँथर, युवा क्रांती दल या चळवळीवर आधारित आहे. या सिनेमात पदमश्री कवी नामदेव ढसाळ यांची कविता आहे. पण, कवितेत शिव्या आहेत, अश्लीलता आहे, असे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडलंय. 

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख यांनी सेन्सॉरच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी 'चल हल्ला बोल'मध्ये ढसाळ यांच्या कविता वापरण्यापूर्वी परवानगी घेतली नसल्याचे त्यानी म्हटले. मल्लिका म्हणाल्या की, त्यांनी कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे. नामदेव यांचे वारस म्हणून त्यांच्या साहित्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. या विरोधात कायदेशीर न्यायालयीन लढा देईन, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Hemant Dhome Today News