केंद्र सरकारच्या नव्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता मराठी अभिनेत्यानेही महाराष्ट्रात हिंदी सक्तीला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शविला आहे.
मराठी अभिनेता हेमंत ढोमेने X अकाऊंटवरुन ट्वीट करत याबाबत त्याचं मत मांडलं आहे. "भारत, एक संघराज्य! राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आपलं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं…म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार! त्या सरकारांनी आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे! विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय? जपू द्या आपली भाषा प्रत्येकाला आणि वाढवूद्या आपली संस्कृती प्रत्येकाला!!!", असं त्याने म्हटलं आहे.
पुढे तो म्हणतो, "मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे! हिंदी ही व्यवहाराची भाषा असूद्या ती आमच्या माथी मारू नका…आणि आहेच की ती शिकायला…येतेच आहे की व्यवहारापूरती…मग हा नवा अट्टाहास कशासाठी? महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे…येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा खांद्यावर खेळली पाहिजे…त्यासाठी कष्टं करा!". हेमंतने त्याच्या ट्वीटमध्ये हिंदी सक्ती नकोच हा हॅशटॅगही वापरला आहे.