Join us

"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:16 IST

Siddharth Ray Death : 'अशी ही बनवा बनवी' फेम सिद्धार्थ रेने नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शांती प्रियासोबत १९९२ साली लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. नुकतेच एका मुलाखतीत शांती प्रियाने सिद्धार्थसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल आणि त्याच्या निधनाबद्दल सांगितले.

'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banva Banvi) या एव्हरग्रीन सिनेमात शंतनूच्या भूमिकेतून अभिनेता सिद्धार्थ रे (Siddharth Ray) याने चांगलीच लोकप्रियता मिळवली. आता तो जगात नसला तरी आजही तो लोकांच्या चांगलाच स्मरणात आहे. सिद्धार्थने नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शांती प्रिया(Shanti Priya)सोबत १९९२ साली लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. नुकतेच एका मुलाखतीत शांती प्रियाने सिद्धार्थसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल आणि त्याच्या निधनाबद्दल सांगितले.

शांती प्रियाने नुकतेच स्क्रीनला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या व सिद्धार्थच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, एका इव्हेंटमध्ये आम्ही भेटलो. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मला स्पेशल वाटलं. तो सिनेइंडस्ट्रीतील एका मोठ्या कुटुंबातून आला होता, पण त्याच्यात अजिबात अॅटिट्यूड नव्हता. नंतर आमची ओळख झाली आणि पहिल्या भेटीला एक वर्ष होण्याआधीच आम्ही लग्नबेडीत अडकलो. लग्नानंतर सिद्धार्थ रे आणि शांती प्रिया यांना दोन मुलं झाली. 

अचानक अभिनेत्याला उचकी आली आणि...सिद्धार्थ रेचं २००४ साली हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्या दिवसाबद्दल अभिनेत्रीने मुलाखतीत खुलासा केली. ती म्हणाली की, ते खूप धक्कादायक होतं. संध्याकाळची जेवणाची वेळ होती. तो धाकट्या मुलाला काहीतरी शिकवत होता. आम्ही सगळेच जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. त्याला अचानक उचकी आली आणि त्याने डोकं खाली टेकवलं. तो अगदी सहज कोणत्याही त्रासाशिवाय गेला. मी हा दिवस कधीच विसरू शकत नाही. 

अभिनेत्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण...ती पुढे म्हणाली, सिद्धार्थला तसं पाहून मला काहीच सुचत नव्हते. मी काहीच करू शकत नव्हते. माझी मदतनीस आली आणि तिने त्याला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले. आमच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर राहत होते. त्यांना बोलावलं. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले. इंजेक्शन दिले. पण काहीच फायदा झाला नाही. डॉक्टरांनी मृत घोषित केले. मी स्तब्ध झाले होते. कसे व्यक्त व्हावे, ते मला कळतच नव्हते. इमोशन व्यक्त करू की जबाबदारी घेऊ, हे मला समजतच नव्हते. त्यानंतर मी लोकांपासून दूर होऊ लागले. रडले नाही. मला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती. सर्व विधी संपल्यानंतर मला अचानक जाणवलं की तो आता आमच्यासोबत नाही. मी आतून कोलमडून गेले होते पण इतरांना ते जाणवू दिलं नाही.  

टॅग्स :सिद्धार्थ डेअशी ही बनवाबनवी