Join us
Daily Top 2Weekly Top 5

'क्षितिज काय लिहिलंय रे बाबा...' ; 'ताली' पाहून गौरी सावंतची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 16:11 IST

Taali: या सीरिजमध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन हिने गौरी सावंतची भूमिका साकारली आहे.

गौरी सावंत यांच्या जीवनावर बेतलेली 'ताली' (taali) ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन हिने गौरी सावंतची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीपासून चर्चेत होते. ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर गौरी सावंत यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

तृतीयपंथीयांच्या न्यायासाठी लढणाऱ्या गौरी सावंत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी 'ताली' पाहिल्यानंतर मराठमोळ्या क्षितिज पटवर्धन याचं कौतुक केलं आहे. क्षितिज पटवर्धनने ताली वेबसीरिजसाठी संवादलेखनाचं काम केलं आहे.

काय म्हणाल्या गौरी सावंत?

"आपलीच 'टाळी' जेव्हा जोरात वाजते, तेव्हा कधी कधी आपणच दचकतो, जसं आपली जीभ आपल्या दाताखाली येते तेव्हा. आज बायोपिक बघताना हेच होतं माझ्या मनात, ठिबक सिंचन डोळ्यातून चालूच होते. तृतीयपंथीयांच्या पालकांना काय वाटत असेल..... होणारी घुसमट, त्रास याला न्याय दिला आहे सुश्मिताने... क्षितिज काय लिहिलंय रे बाबा... रवी जाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केले आहे. माझ्या संपूर्ण समाजाकडून मी तुमचे आभार मानते... सरळ सोप्या पद्धतीने माझे आयुष्य दाखवल्याबद्दल... अफिफा नडीयादवाला हिने मला नव्याने जगासमोर आणलं.. कार्तिक आणि अर्जुन यांचेही आभार..", असं म्हणत गौरी सावंतने त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, १५ ऑगस्टचं निमित्त साधत ताली ही वेबसीरिज जिओ सिनेमावर रिलीज करण्यात आली. या सीरिजमध्ये सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत झळकली असून अभिनेता सुव्रत जोशी याने गौरी सावंतच्या तरुणपणीची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत हेमांगी कवि, ऐश्वर्या नारकर हे मराठी कलाकारही झळकले आहेत.

टॅग्स :वेबसीरिजसुश्मिता सेनसुव्रत जोशीहेमांगी कवीऐश्वर्या नारकर