'गेम चेंजर' चित्रपटाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. 'गेम चेंजर' हा दिग्गज चित्रपट निर्माता एस शंकर दिग्दर्शित आगामी राजकीय ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीसह राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. भ्रष्ट राजकीय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी लढा देणारा एक IAS अधिकारी राम चरण यांच्या व्यक्तिरेखेवर कथानक केंद्रित आहे. या चित्रपटाची ट्रेलरबद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय.
या तारखेला रिलीज होणार 'गेम चेंजर'चा ट्रेलर
राम चरण आणि कियारा अडवाणी अभिनीत 'गेम चेंजर' चित्रपटाची अधिकृतपणे ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात निर्माते दिल राजू यांनी चित्रपटाविषयी एक महत्वाची अपडेट शेअर केली. 'गेम चेंजर'चा ट्रेलर १ जानेवारी २०२५ रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांसाठी रिलीज होणार आहे. कालच 'गेम चेंजर'चा ट्रेलर अजून आला नाही म्हणून एका चाहत्याने स्वतःचं जीवन संपवण्याचं धमकीवजा पत्र मेकर्सला दिलं होतं. त्यामुळे तातडीने 'गेम चेंजर'च्या मेकर्सने सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केल्याचं बोललं जात होतं.
चाहत्याने 'गेम चेंजर'च्या मेकर्सना लिहिलेलं RIP लेटर
सोशल मीडियावर काल राम चरणला चाहत्याने लिहिलेलं RIP पत्र व्हायरल झालंय. या पत्रात लिहिलं होतं की, "तुम्ही चाहत्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करताय. तुम्ही जर या महिन्याअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या निमित्ताने गेम चेंजरच्या टीझरविषयी कोणतीही अपडेट किंवा सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला नाही, तर मला हे सांगण्यात अतिशय दुःख होतंय की, मी माझं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलेन." त्यामुळे आता सर्वांना 'गेम चेंजर'च्या ट्रेलरची आणि सिनेमाच्या रिलीजची उत्सुकता आहे.