Join us

'फसक्लास दाभाडे'ची इंग्लंडवारी! हेमंत ढोमे पोस्ट शेअर करत म्हणाला- "माझं एक स्वप्न पूर्ण होतंय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:38 IST

Fussclass Dabhade Movie : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा बहुप्रतिक्षित चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला असून हे दाभाडे कुटुंब प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' (Fassclass Dabhade Movie) हा बहुप्रतिक्षित चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला असून हे दाभाडे कुटुंब प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाचे केवळ महाराष्ट्रातच नाही तर युएई, गल्फ कंट्रीजमध्येही ग्रँड ओपनिंग झाले आहे. त्यानंतर आता हा चित्रपट युकेमध्येही रिलीज होत आहे. यानिमित्ताने निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता हेमंत ढोमेने पोस्ट शेअर केली आहे.

हेमंत ढोमेने फसक्लास दाभाडेचे पोस्टर शेअर करत लिहिले की, ''युकेमधली मराठी मंडळी तुम्ही कायम विचारायचात की मराठी सिनेमा युकेमध्ये का रिलीज होत नाही… तर हे घ्या, आपला फसक्लास दाभाडे इंग्लंडमध्ये रेग्युलर रिलीज करतोय! या निमित्ताने माझं एक स्वप्न पूर्ण होतंय… तेव्हा इंग्लंडमधल्या माझ्या तमाम मराठी प्रेक्षकांना विनंती, आपली तिकीटे लवकरात लवकर बुक करा! या सेंटर्सवर चांगला प्रतिसाद दिलात तर अजून सेंटर्सवर रिलीज करण्याचा शब्द देतो! सिनेवर्ल्डच्या App वर जाऊन अथवा वेबसाईटवर वर जाऊन तुमच्या जवळचे सेंटर सिलेक्ट करा आणि तिकीट एका झटक्यात बुक करा! चला तर मग आता एकत्र यावंच लागतंय''.

दाभाडे कुटुंबातील लग्नकार्य, नात्यात आलेला दुरावा, गैरसमज, सामाजिक विचारसरणी, रूढी परंपरा अशा अनेक गोष्टींवर फसक्लास दाभाडे या चित्रपटात अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. खदखदून हसवतानाच डोळ्यांची किनार पाणवणारा हा चित्रपट म्हणजे प्रत्येकासाठी मनोरंजनाची मेजवानी ठरत आहे. टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते असणाऱ्या या चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

टॅग्स :Hemant Dhome Today Newsसिद्धार्थ चांदेकरअमेय वाघ