-राजेंद्र कुमारलखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये अभिनेता आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्यासह सातजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वांविरुद्ध गोमतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर एलयूसीसी कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने ४५ जणांकडून नऊ कोटींहून अधिक रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना ६ वर्षांत त्यांचे पैसे दुप्पट करण्याची ऑफर दिली होती.
अनिस अहमद यांच्या तक्रारीवरून, दोन्ही कलाकारांसह कंपनीच्या कोअर टीमचे सदस्य डॉ. उत्तम सिंह राजपूत, व्यवस्थापक समीर अग्रवाल अशा एकूण सातजणांविरुद्ध बीएनएस कलम ४०९ व ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस लवकरच आलोक नाथ व श्रेयस यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत.
काय आहे प्रकरण?
तक्रारीत अनिसयांनी म्हटले आहे की, आठ वर्षांपूर्वी उत्तम सिंह राजपूत यांची भेट झाली होती. त्यांच्या सांगण्यावरून एलयूसीसी कंपनीत दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
ही रक्कम सहा वर्षांत दुप्पट होईल, असे सांगण्यात आले होते. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत एलयूसीसी नोंदणीकृत आहे. याचा प्रचार आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे करतात.