Join us

‘बुलाती है मगर जाने का नहीं’ फेम प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 17:55 IST

आज सकाळी राहत इंदौरी यांनी ट्विट करुन म्हटलं होतं की, कोविड १९ चे सुरुवातीचे लक्षण दिसल्यानंतर मी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

इंदूर – प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना ह्दयविकाराचा झटका आल्यानं त्यांचे निधन झालं आहे. त्यांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं त्यामुळे उपचारासाठी त्यांना मध्यप्रदेशातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० ऑगस्टला रात्री उशिरा त्यांना ऑरबिंदो रुग्णालयात उपचारासाठी हलवल होतं. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी ही माहिती दिली होती.

आज सकाळी राहत इंदौरी यांनी ट्विट करुन म्हटलं होतं की, कोविड १९ चे सुरुवातीचे लक्षण दिसल्यानंतर मी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ऑरबिंदो रुग्णालयात दाखल आहे. प्रार्थना करा, मी लवकरात लवकर बरा होवो, त्याचसोबत मला आणि घरच्या लोकांना फोन करु नका, माझ्या तब्येतीबद्दल तुम्हाला ट्विटर आणि फेसबुकवर माहिती दिली जाईल.

 

रुग्णालयात उपचार घेताना राहत इंदौरी यांना अचानक ह्दयविकाराचा झटका आला, डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना अपयश आलं. संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटाला राहत इंदौरी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

कोण आहेत राहत इंदौरी?

राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर आहेत. त्याचसोबत बॉलिवूडमध्येही त्यांनी अनेक गाणी लिहिली आहेत. ते उर्दू साहित्यातील अभ्यासक होते. त्याचसोबत उत्तम वक्ते होते. त्यांच्या शायरीने अनेक तरुणांची मन जिंकली, त्यामुळे टिकटॉकसारख्या माध्यमातून वो बुलाती है मगर जाने का नही या शायरीने धुमाकूळ माजवला होता. भारतासह त्यांना परेदशातूनही निमंत्रण येत असे. त्यांची क्षमता, प्रचंड मेहनत आणि शब्दकौशल्य कायम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यात शंका नाही. राहत इंदौरी फक्त साहित्यात आणि कलेत माहिर होते असं नाही तर शाळा-कॉलेजच्या दिवसात ते फुटबॉल आणि हॉकीटीमचे कॅप्टनही होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना कॉलेजमध्ये आपली पहिली शायरी ऐकवली होती.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या