Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाच्या नेपोटिझमच्या वक्तव्यावर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला, "माझे सिनेमे हिट असूनही तिला गँगस्टरमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:54 IST

"करोना आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये...", इमरान हाशमीने कंगनाच्या नेपोटिझमच्या वक्तव्यावर मांडलं मत

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत अभिनयाबरोबरच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. कंगनाच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या वक्तव्यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. समाजात घडणाऱ्या गोष्टींबाबत परखडपणे व्यक्त होणाऱ्या कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिजमबद्दल अनेकदा वक्तव्य केली आहेत. आता यावर बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीने स्पष्ट शब्दांत त्याचं मत मांडलं आहे. कंगनाने नेपोटिझमबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

कंगना आणि इमरानने 'गँगस्टर' सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्याने नुकतीच 'इंडियन एक्सप्रेस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "एक अभिनेत्री आणि माणूस म्हणून मला कंगना आवडते. कदाचित सिनेइंडस्ट्रीत वाईट अनुभव तिच्या वाट्याला आले असतील. पण, तिच्याबरोबरचा माझा अनुभव वेगळा आहे. 'गँगस्टर' सिनेमात मी खलनायकाची भूमिका स्वीकारली. तेव्हा माझे अनेक चित्रपट हिट गेले होते. पण, तरीही कंगनाला मुख्य भूमिका मिळाली. कारण, तो सिनेमा स्त्रीकेंद्री होता. इंडस्ट्रीबद्दल अशी धारणा केव्हापासून झाली, हे मला माहीत नाही. पण, इथले लोक ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत आणि इथे फक्त नेपोटिझम चालतं, असा लोकांचा समज आहे. पण, हे सत्य नाही." 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीमध्ये नकारात्मक गोष्टी वाढल्या आहेत, असंही इमरान पुढे म्हणाला. "करोनानंतर आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नकारात्मक गोष्टी वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये नाराजगी होती. त्यानंतर लोकांनी बॉलिवूडला बॉयकॉट करायला सुरुवात केली होती," असंही पुढे त्याने सांगितलं. 

इमरान हाशमी सध्या त्याच्या आगामी 'शोटाइम' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर त्याची ही सीरिज ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या प्रमोशनमध्ये इमरान सध्या व्यग्र आहे. शोटाइमध्ये इमरानबरोबर मौनी रॉय, नसरुद्दीन शाह, महिमा मखवाना, श्रीया सरन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :इमरान हाश्मीकंगना राणौतसेलिब्रिटी