यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्या गुरुग्राममधील घराबाहेर रविवारी (१७ ऑगस्ट) पहाटे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बाइकवरून आलेल्या तीन अज्ञात लोकांनी घराजवळ थांबून सुमारे १० ते १२ गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी दहशत पसरली. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.
या घटनेवेळी एल्विश स्वतः घरात नव्हता, पण घरात त्याचा एक कर्मचारी आणि इतर काही लोक उपस्थित होते. गोळीबारानंतर स्थानिकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची तपासणी केली. सध्या पोलिसांनी CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. आरोपींनी हेल्मेट घातलेले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र तपास सुरू असून, लवकरच त्यांना अटक होईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.
गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेला दिली आहे. या गोळीबाराचा नेमका उद्देश काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काहींच्या मते हा एल्विशला घाबरवून इशारा देण्यासाठी केलेला गोळीबार असू शकतो. या घटनेनंतर एल्विश यादवच्या घराजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे. एल्विश यादवचे चाहते आणि फॉलोअर्स यांनी त्याच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत सलमान खानचं घराबाहेर झालेला गोळीबार, कपिल शर्माच्या रेस्टॉरंटबाहेर झालेला गोळीबार या घटनानंतर आता एल्विशच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने सर्वत्र घबराटीचं वातावरण आहे.