Join us

'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये मी डबल रोल केलाय; दिलीप प्रभावळकरांचा मोठा खुलासा, तुम्हालाही बसेल धक्का

By देवेंद्र जाधव | Updated: September 18, 2025 11:51 IST

दशावतार फेम दिलीप प्रभावळकरांनी संजय दत्तच्या लगे रहो मुन्नाभाई सिनेमात डबल रोल केलाय. जाणून घ्या याचविषयी

सध्या 'दशावतार'निमित्त दिलीप प्रभावळकरांनी विविध मुलाखती देऊन खास किस्से सांगत आहेत. काही वर्षांपूर्वी आलेला 'लगे रहो मुन्नाभाई' हा सिनेमा चांगलाच गाजला. दिलीप प्रभावळकरांनी या सिनेमात महात्मा गांधींची भूमिका साकारली. दिलीप यांनी साकारलेली ही भूमिका प्रचंड गाजली. ही भूमिका कशी मिळाली, याचा किस्सा तुम्ही आजवर वाचला असेल. पण दिलीप यांनी 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये डबल रोल केलाय, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. स्वतः दिलीप प्रभावळकरांनी याविषयी आश्चर्चजनक खुलासा केलाय. बघा काय म्हणाले?अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला मुलाखतीत दिलीप यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ''मला आश्चर्य वाटलं की, त्यांनी सिनेमात माझा तो सीन ठेवलाय. झालं असं की, माझं त्या दिवशी गांधींचं शूटिंग संपलं होतं. गांधींसाठी मी संपूर्ण गोटा केला होता. दोन-सव्वा दोन तास मेकअप चालायचा. इतक्या वर्षांनंतर दशावतार मध्ये परत त्याच अवतारामध्ये दोन तास संयमाने मेकअप केला. खूप त्रासदायक असायचा मेकअप. तरीही गांधींची भूमिका साकारत असल्याने चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायला लागायचे. एके दिवशी शूटिंग लवकर संपलं.''''मी गोटा केला असल्याने डोक्यावर एक टोपी घालायचो. आणि माझी शबनम पिशवी किंवा शोल्डर बॅग घेऊन बसलो होतो. शूटिंग संपलं की जाणार होतो. राजेश मापुस्कर सिनेमाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. लोक गेट वेल सूनचं बुके बोमन इराणीला द्यायचे. बुके देऊन त्याला चिडवायचे. बाकीची वृद्ध माणसं त्याच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे बोमन वैतागतो. तर बुके घेऊन जाणाऱ्यामध्ये राजू म्हणाला की, तुम्ही पण एक बुके घेऊन जा. मी त्याला म्हटलं, आता मी कशाला. गांधींचा मेकअप पुसलाय मी. तो म्हणाला नाही करा तुम्ही. तर पुढे मी तसा गेलो आणि बुके ठेवला तिथे. आणि त्याने सिनेमात तो सीन ठेवला.'' अशाप्रकारे दिलीप यांनी हा मोठा खुलासा केला.त्यामुळे जेव्हा तुमही 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमा पुन्हा एकदा बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला दिलीप यांचा हा सीन दिसेल. सध्या दिलीप यांच्या 'दशावतार' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने अवघ्या काही दिवसात कोटींमध्ये कमाई केलीय.

टॅग्स :दिलीप प्रभावळकर मराठी चित्रपटसंजय दत्तबोमन इराणीराजकुमार हिरानी