Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी नव्हे तर या अभिनेत्रीच्या सांगण्यावरून सोडली होती दारू, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 06:30 IST

धर्मेंद्र यांनी दारू कोणत्या अभिनेत्रीच्या सांगण्यावरून सोडली होती याचे कारण नुकतेच त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देमी तुम्हाला सांगितले की, मी दारूचा वास लपवण्यासाठी कांदा खातो, तर त्यावर तुम्ही मला दारू सोडायला सांगितले. तुमच्या सांगण्यावरून मी दारू पिणे सोडले आणि त्यामुळे आपल्यात छान मैत्री झाली. आपण जणू एका कुटुंबातले झालो,” असे धर्मेंद्र आशा पारेख यांना म्हणाले.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच एक जबरदस्त लहान मुलांचा गायन रिॲलिटी शो ठरला आहे. प्रत्येक आठवड्याला या लहान मुलांची अप्रतिम सादरीकरणे प्रेक्षकांनी पाहिली आहेत आणि आता ही स्पर्धा शिगेस पोहोचते आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात वरिष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान आणि आशा पारेख प्रमुख पाहुणे म्हणून येऊन या मंचाची शोभा वाढवणार आहेत.  

या भागादरम्यान धर्मेंद्र यांनी व्हिडिओद्वारे आशा पारेख आणि वहिदा रहमान यांना खास संदेश दिला. वहिदा रहमान आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. धर्मेंद्र म्हणाले की, वहिदा रहमान यांचा चौदहवी का चाँद हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाच्यावेळी वहिदा यांच्या लोक अक्षरशः प्रेमात पडले होते. त्या चित्रपटानंतर माझी प्रार्थना फळली आणि मला त्यांच्यासोबत बाझी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कॅमेर्‍यासमोर असेपर्यंत मी माझ्या भूमिकेत शिरलेलो असायचो. पण कॅमेर्‍याच्या मागे मात्र मी पुन्हा तसाच बुजरा आणि अंतर्मुख होऊन जात असे. तुम्ही मला खूप आधार दिला आणि मदत केली.” धर्मेंद्र आशा पारेख यांच्याबद्दल म्हणाले, “आशा पारेख यांचे प्रत्येक अभिनेत्यासोबतचे चित्रपट सुपर डुपर हिट होते आणि मी त्यांना ज्युबिली पारेख म्हणायचो. मग मला तुमच्यासोबत ‘आए दिन बहार के’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आपण तेव्हा दार्जिलिंगमध्ये चित्रीकरण करत होतो. त्यावेळी पॅक-अप केल्यानंतर निर्माते आणि इतर क्रू सदस्य यांच्या पार्ट्या रात्री उशिरापर्यंत रंगत असत. मी देखील त्यात सामील असे आणि मद्यपान करत असे. सकाळी त्याचा वास यायचा आणि तो लपवण्यासाठी मी कांदा खायचो... पण तुम्ही अशी तक्रार करायच्यात की या अभिनेत्याला कांद्याचा वास येतो आणि मला तो आवडत नाही. मी तुम्हाला सांगितले की, मी दारूचा वास लपवण्यासाठी कांदा खातो, तर त्यावर तुम्ही मला दारू सोडायला सांगितले. तुमच्या सांगण्यावरून मी दारू पिणे सोडले आणि त्यामुळे आपल्यात खूप छान मैत्री झाली. आपण जणू एका कुटुंबातले झालो.” 

यावर आशा पारेख म्हणाल्या, “आए दिन बहार के चित्रपटात असे एक गाणे आहे, ज्यात धर्मेंद्रजी पाण्यात नाचत आहेत. पण  चित्रीकरणाच्यावेळी थंडीमुळे ते हिरवे-निळे पडायचे. प्रत्येकवेळी कट म्हटल्यानंतर ते पाण्याच्या बाहेर यायचे, सर्व जण त्यांना ब्रॅन्डी देण्यासाठी सरसावायचे आणि ते माझ्याकडे पाहायचे... कारण मी त्यांना सांगितले होते की, जर ते दारू प्यायले, तर मी सेटवर येणार नाही किंवा सेट सोडून निघून जाईन. असे 2-3 दिवस चालले, पण माझा मान राखून ते दारूला शिवले नाहीत.”

 सुपरस्टार सिंगरचा हा भाग प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :धमेंद्रआशा पारेखवहिदा रहमान