Join us
Daily Top 2Weekly Top 5

दयानंद शेट्टीच्या फॅन्ससाठी खुशखबर,परततोय या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 17:37 IST

प्रेक्षकांचा हा लाडका दया प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका मालिकेत पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देसावधान इंडिया हा गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आता दयानंद शेट्टी करणार आहे.

CID या मालिकेने कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दोन वर्षांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सीआयडी मालिकेसोबतच त्याच्यातील कलाकारांनीही फॅन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या मालिकेतील दया म्हणजेच दयानंद शेट्टी हा तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. त्याला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याची दरवाजा तोडण्याची स्टाईल तर प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. प्रेक्षकांचा हा लाडका दया प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका मालिकेत पाहायला मिळणार आहे.

सावधान इंडिया हा गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आता दयानंद शेट्टी करणार आहे. दयानंदचा या कार्यक्रमात प्रवेश झाल्यानंतर या कार्यक्रमात काही बदल देखील केले जाणार आहेत. दयानंद सोबत या मालिकेत अंकुर नय्यर आणि मानिनी मिश्रा हे कलाकार देखील पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दयानंदने त्याच्या या नव्या कार्यक्रमाबाबत अमरउजालाशी बोलताना सांगितले की, मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. मी कार्यक्रम, चित्रपट यांच्यात अनेक वर्षांपासून अभिनय करत आहे. पण कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. 

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दयानंद शेट्टी हा एक खेळाडू होता. 1994 मध्ये महाराष्ट्रातून डिस्कस थ्रोचा तो चॅम्पियन होता. डिस्कस थ्रो या गेममध्ये चॅम्पियन झाल्यानंतर दयानंदकडे अभिनयाची संधी चालून आली. सीआयडी या मालिकेसाठी त्याने ऑडिशन दिले आणि या ऑडिशनमध्ये तो पासही झाला. इन्स्पेक्टर दयाच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. सीआयडी या मालिकेने त्याच्या आयुष्याला वेगळे वळण दिले. त्याने या मालिकेनंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. यात सिंघम रिटर्न्स, जॉनी गद्दार आणि रनवे या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

टॅग्स :सीआयडी