Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला', अश्विनी महांगडेची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:57 IST

अश्विनी महांगडेचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी महांगडेचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे काल कोरोनाने निधन झाले आहे. त्यानंतर अश्विनीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपल्याचे म्हटले आहे. 

अश्विनी महांगडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला. कधी कधी स्वतःचे कपडे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करीत राहिले व मलाही तेच शिकवले. गेले १५ दिवस कोरोनाशी वाघासारखे लढले पण अखेरीस ही झुंज अपयशी ठरली. काळाने घाला घातला व आम्हाला पोरके केले. काल जाता जाता एक सांगून गेले की समाजासाठी काही केले नाही तर आपले आयुष्य निरर्थक. 

तिने पुढे म्हटले की, नाना...माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ, माझे मार्गदर्शक, माझी ताकद, माझा पाठीराखा आणि माझा बापमाणूस. 

कोरोनाच्या संकटात अश्विनी महांगडे अनेकांच्या मदतीसाठी धावून आली आहे. तिने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून तिने अनेक लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे. 

अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील राणू आक्का साहेब यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारते आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या आधी अश्विनी महांगडे अस्मिता मालिकेत मनालीच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. याशिवाय तिने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिकास्वराज्य रक्षक संभाजीकोरोना वायरस बातम्या