'कोल्डप्ले' या आंतरराष्ट्रीय म्यूझिक बँडचा भारतात सध्या दौरा आहे. या म्यूझिक कॉन्सर्टचा पहिला शो शनिवारी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये झाला. 'म्यूझिक ऑफ द स्फीयर' या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या पहिल्या शोला प्रेक्षकांचा हाउसफुल्ल प्रतिसाद मिळाला. यादरम्यान कोल्डप्ले गायकांनी कॉन्सर्टच्या सुरुवातीलाच भारतीय प्रेक्षकांचं मन जिंकलं. 'कोल्डप्ले' बँडच्या गायकांनी 'जय श्रीराम'चा नारा लगावला. इतकंच नव्हे ब्रिटिशांनी भारतावर जे अत्याचार केले त्याबद्दल माफीही मागितली.
कोल्डप्ले गायकांच्या कृतीने जिंकलं प्रेक्षकांचं मन
कोल्डप्ले बँडचा गायक क्रिस मार्टिनने बँडचं परफॉर्मन्स करताना उपस्थित प्रेक्षकांना संबोधित केलं. क्रिस म्हणाला की, "भारतातील ही आमची चौथी टूर आहे. या ठिकाणी आम्ही दुसऱ्यांदा परफॉर्म करतोय. पहिल्यांदाच आम्ही इतका मोठा शो करतोय. तुमच्यासारखे दर्दी प्रेक्षक मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमचं स्वागत करताय ही फार मोठी गोष्ट आहे. आम्ही ग्रेट ब्रिटनमध्ये राहणारे असलो तरी ब्रिटनद्वारे जी वाईट कामं करण्यात आली आहेत, त्यासाठी आम्हाला माफ केल्याबद्दल धन्यवाद."
कोल्डप्लेच्या गायकाने लगावला जय श्रीरामचा नारा
याशिवाय कॉन्सर्टच्या आधी क्रिसने जय श्रीरामचा नारा लगावला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. कॉन्सर्टदरम्यान उपस्थित प्रेेक्षकांनी कोल्डप्लेच्या गायकांना प्रशंसारुप पत्र पाठवली होती. त्यावेळी एका प्लेकार्डवर 'जय श्रीराम' असं लिहिलं होतं. क्रिसने हे कार्ड वाचलं आणि सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या. याशिवाय हिंदी भाषेत कोल्डप्लेच्या गायकांनी सर्वांना अभिवादन केलं. अशाप्रकारे कोल्डप्ले बँडने भारतीय प्रेक्षकांचं मन जिंकलं. शनिवारी डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये परफॉर्म केल्यावर कोल्डप्लेचा पुढील शो अहमदाबादमध्ये आहे.